RTE Admission 2023 : प्रवेशाबाबत संभ्रम कायम; पालक हतबल

आरटीई प्रवेशाचे पोर्टल बंद असल्यामुळे अनेक पालकांना प्रवेशाबाबतची माहिती जाणून घेता आली नाही. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला.

RTE Admission 2023 : प्रवेशाबाबत संभ्रम कायम; पालक हतबल
RTE Admission

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) प्रवेशाची लॉटरी काढण्यात आली असून राज्यातील १ लाख १ हजार ८४६ जागांसाठी ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. त्यात पुण्यातील (Pune) १५ हजार ५०१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्रवेशापूर्वी येत्या २५ एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांच्या (Students) कागदपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे. मात्र पडताळणी कुठे करावी याबाबत अनेक पालकांमध्ये संभ्रम आहे. (RTE Admission 2023 Latest News)   

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे भारतीय प्रवेशाचे ऑनलाईन लॉटरी बुधवारी (दि.१२) जाहीर करण्यात आली. परंतु, आरटीई प्रवेशाचे पोर्टल बंद असल्यामुळे अनेक पालकांना प्रवेशाबाबतची माहिती जाणून घेता आली नाही. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला. मात्र, राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती विद्यार्थ्यांना ऑनलाईन लॉटरीद्वारे प्रवेश देण्यात आला आहे, याबाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे. परंतु, पालकांमध्ये अजूनही संभ्रम कायम आहे.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

संकेतस्थळ दोन दिवस बंद असल्याने अनेक पालकांना अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढता आली नाही. त्याचप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी कुठे करावी याबाबत माहिती नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने याबाबत मार्गदर्शन करावे अशी मागणी पालक करत आहेत. पुणे जिल्ह्यातील ९३४  शाळांमधील १५ हजार ५९६  जागांसाठी ७७ हजार ५३१ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील १५ हजार ५०१ विद्यार्थ्यांना ऑनलाइन लॉटरी द्वारे प्रवेश देण्यात आला आहे.

राज्यात आरटीई प्रवेशाच्या १  लाख १  हजार ८४६  जागा असून प्रवेशासाठी ३  लाख ६४  हजार ४१३ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात लॉटरी द्वारे सर्व जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असलेल्या जागांवर विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २८७ जागा असून प्रवेशासाठी केवळ २३२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यामुळे या ठिकाणी लॉटरी काढण्याची आवश्यकता नव्हती. परंतु सिंधुदुर्गात १८४ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे.

''माझ्या मुलाला आरटीईतून प्रवेश मिळाला असून प्रवेशाचा एसएमएस प्राप्त झाला आहे. मात्र प्रवेश मिळाल्याचे पत्र डाऊनलोड होत नाही. संकेतस्थळ दोन दिवस बंद असल्याने काहीही करता आले नाही. शाळेत गेल्यानंतर त्यांनी कागदपत्रांची पडताळणी करावी लागेल, असे सांगितले. त्यामुळे एसएमएस आल्यावर पुढे काय करावे, याबाबत आम्हा पालकांमध्ये संभ्रम आहे.''

 – शिवानंद लांबतुरे, पालक