फार्मसीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; प्रथम वर्षात नापास झालेल्यांना मिळणार एक संधी
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील प्रथम वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया विलंबाने सुरू झाल्याच्या कारणास्तव विद्यार्थी हितासाठी हा निर्णय घेतल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
औषधनिर्माणशास्त्र (Pharmacy) पदविका अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षा २०२३ मध्ये अनुत्तीर्ण झालेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना एक संधी देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने (Maharashtra state board of technical education) घेतला आहे. त्यानुसार या विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षात तात्पुरता प्रवेश दिला जाणार असून त्यांना हिवाळी परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच दुसऱ्या वर्षाची परीक्षा देता येणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. (Pharmacy Examination)
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील प्रथम वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया विलंबाने सुरू झाल्याच्या कारणास्तव विद्यार्थी हितासाठी हा निर्णय घेतल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. एक वेळ संधी विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये द्वितीय वर्षाचे सत्र पूर्ण करून घेण्यासाठीच आहे. प्रथम वर्षातील ज्या विद्यार्थ्यांनी २०२२-२३ सत्र पूर्ण केले आहे, त्यांनाच दुसऱ्या वर्षात प्रवेश देण्यात येऊन सत्र पूर्ण करून घेण्याची संधी मिळणार आहे.
UGC NET २०२३ : परीक्षेचा निकाल जाहीर
हिवाळी परीक्षा २०२३ मध्ये प्रथम वर्षाच्या अनुत्तीर्ण विषयांत जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील व दुसऱ्या वर्षात प्रवेशास पात्र होतील, असे विद्यार्थी उन्हाळी परीक्षा २०२४ पासून द्वितीय वर्षाची परीक्षा देण्यास पात्र ठरतील. प्रथम वर्षाच्या अंतिम परीक्षेत गैरप्रकार प्रकरणी शिक्षा झालेल्या विद्यार्थ्यांनी ही संधी मिळणार नाही. एक वेळी संधीसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी संस्थेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध केली जाईल. ही संधी घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे संस्थेने मंडळाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी करणे बंधनकारक राहील. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनाच संधी मिळणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
एक वेळ संधीमुळे एका विशिष्ट वर्गात विद्यार्थी संख्या जास्त झाल्यास नियमित तसेच ही संधी प्राप्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी संस्थेने वेगळा वर्ग तयार करून सैक्षणिक कामकाज पूर्ण करावे, अशा सुचना मंडळाने संस्थांना दिल्या आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुत्तीर्ण विषयांचे आकलन योग्यप्रकारे होण्यासाठी विषयनिहाय अध्यापन वर्ग घ्यावे लागणार आहेत. शनिवार, रविवार किंवा नियमित वेळापत्रकाव्यतिरिक्त दररोज एक किंवा दोन जादा तासिका घेण्यास सांगण्यात आले आहे.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD
eduvarta@gmail.com