RTE अंतर्गत श्रीमंतांच्या मुलांना प्रवेश द्या, नाहीतर कारवाई! शिक्षण विभागाकडून दबाव, तीन शाळांचा गंभीर आरोप

के. एस. डी. शानबाग स्कुलच्या संचालिका आंचल शानबाग, गुरुकुल प्रायमरी स्कुलचे संचालक राजेंद्र चोरगे आणि युनिव्हर्सल स्कुलचे प्रमुख नितीन माने यांनी याबाबत पत्रक काढून गंभीर आरोप केले आहेत.

RTE अंतर्गत श्रीमंतांच्या मुलांना प्रवेश द्या, नाहीतर कारवाई! शिक्षण विभागाकडून दबाव, तीन शाळांचा गंभीर आरोप
RTE Admission

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सध्या राज्यात RTE प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्यात आहेत. शासनाकडून थकीत असलेली शुल्क प्रतिपूर्तीची (Fee Reimbursement) रक्कम, RTE च्या नियमांना फाटे फोडून श्रीमतांच्या मुलांना  देण्यात येत असलेले प्रवेश, अशा अनेक तक्रारींमुळे RTE प्रवेश प्रक्रिया पुन्हा वादाचा मुद्दा बनला आहे. अशातच आता काही खाजगी शाळा प्राथमिक शिक्षण विभागावर (School Education Department) गंभीर आरोप करत आहेत. श्रीमंतांच्या मुलांना RTE अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश द्या, नाहीतर कारवाईला सामोरे जा, अशी धमकीच प्राथमिक शिक्षण विभाग देत आहेत, अशी माहिती साताऱ्यातील तीन शाळांनी  एका पत्रकाद्वारे उघड केली आहे.  

के. एस. डी. शानबाग स्कुलच्या संचालिका आंचल शानबाग, गुरुकुल प्रायमरी स्कुलचे संचालक राजेंद्र चोरगे आणि युनिव्हर्सल स्कुलचे प्रमुख नितीन माने यांनी याबाबत पत्रक काढून गंभीर आरोप केले आहेत. पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, आमच्या तिन्ही शाळांमध्ये RTE अंतर्गत आलेल्या एकूण अर्जांपैकी सुमारे ६० टक्के अर्ज खोटी माहिती असलेले आहेत. हे लोक सधन कुटुंबातील असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही सर्वांनी  मिळून शिक्षण विभागाकडे तक्रार केली. पण शिक्षण विभागाने त्याकडे दुर्लक्ष करून उलट या ६० टक्के मुलांना RTE अंतर्गत प्रवेश द्यावा, यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग आणि शिक्षण अधिकारी आमच्या तिन्ही शाळांवर दबाव टाकत आहेत.

शैलजा दराडेंना भोवले ‘हे’ प्रकरण! सूरज मांढरे यांच्या अहवालानंतरच निलंबन

शाळा बंद पाडू अशी धमकी आम्हाला दिली जात आहे. शिक्षण विभागाचे अधिकारी वारंवार आमच्या शाळेत येऊन कागदपत्रे तपासायची आहेत, असे सांगून आमच्यावर कारवाईचा बडगा उचलत आहेत. अशा अनेक शाळा आहेत, जिथे हे प्रकार घडत आहेत. पण कारवाईच्या भीतीने शाळा समोर यायला घाबरत आहेत. आम्ही पुढे आलो आहोत. आमच्या शाळेतील काही पालकांनी या विरुद्ध न्यायालयात याचिकाही दाखल केल्या आहेत. त्यामुळे आमच्यावर कारवाई करण्याची धमकी दिली जात आहे," असे त्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

याविषयी एज्युवार्ता शी बोलताना IESA चे उपाध्यक्ष राजेंद्र चोरगे म्हणाले, RTE च्या नियमांची पायमल्ली करून काही सधन कुटुंबातील  पालकांनी त्यांच्या पाल्यांसाठी के. एस. डी. शानबाग स्कुल , गुरुकुल प्रायमरी स्कुल, आणि युनिव्हर्सल स्कुलमध्ये  प्रवेश घेण्यासाठी अर्ज केले आहेत. एका जागरूक नागरिकाने ही बाब आमच्या लक्षात आणून दिली.

RTE Admission : शुल्क प्रतिपूर्ती रकमेत वाढ होणार की नाही? संस्थाचालक हवालदिल

आम्ही  या अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्या गोष्टीत तथ्य असल्याचे आमच्या लक्षात आले.  RTE च्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या पालकांची नावे त्यांच्या अर्जांसाहित पुढील चौकशीसाठी आम्ही प्राथमिक शिक्षण विभाग, सातारा यांना पाठवली. या अर्जांची पडताळणी करून अर्जदारांचा खरा पत्ता, त्यांचे वार्षिक उत्पन्न आदींविषयी चौकशी व्हावी, त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली होती, असे चोरगे यांनी सांगितले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD