SPPU: कुलसचिव,अधिष्ठात्यांची नियुक्ती जूननंतरच ;काय आहे कारण... 

लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यामुळे विद्यापीठांना कोणत्याच पदाच्या मुलाखती घेता येत नाहीत.परिणामी विद्यापीठातील रिक्त पदाच्या मुलाखतीसाठी जून महिन्यांपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

SPPU: कुलसचिव,अधिष्ठात्यांची नियुक्ती जूननंतरच ;काय आहे कारण... 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव, अधिष्ठाता (Savitribai Phule Pune University Dean and Registrar) आणि 'सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस'च्या संचालकपदाच्या मुलाखती केव्हा होणार ? याबाबत विद्यापीठाच्या अधिसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.मात्र,लोकसभेची आचारसंहिता (Code of Conduct of Lok Sabha)लागू झाल्यामुळे विद्यापीठांना कोणत्याच पदाच्या मुलाखती घेता येत नाहीत.परिणामी विद्यापीठातील रिक्त पदाच्या मुलाखतीसाठी जून महिन्यांपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

राज्यातील एका विद्यापीठाने आचार संहितेच्या काळात मुलाखती घेता येतील का ? याबाबत निवडणूक अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता.मात्र, आचार संहिता लागू झाल्यानंतर मुलाखती घेता येणार नसल्याचे विद्यापीठाला कळवण्यात आले.त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियुक्त्या सुध्दा रखडणार आहेत.विद्यापीठाच्या कुलसचिव, अधिष्ठाता आणि सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस' संचालक या महत्त्वाच्या पदावर सध्या प्रभारी व्यक्ती नियुक्त करण्यात आले आहेत.परंतु, या सर्व पदासाठी अर्ज केलेल्या व्यक्तींकडून मुलाखती केव्हा घेतल्या जाणार आहेत, याबाबत सातत्याने विचारणा केली जात आहे. 

अधिष्ठाता पदासाठी आरक्षण लागू आहे किंवा नाही याबाबत विद्यापीठाने शासनाकडे पत्रव्यहार केला आहे. त्यासंदर्भातील उत्तर अद्याप विद्यापीठाला प्राप्त झाले नाही. तसेच  कुलसचिव, अधिष्ठाता आणि 'सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस'च्या संचालकपदाच्या मुलाखती घेणे सुध्दा शक्य नाही.परिणामी निवडणुकीपर्यंत विद्यापीठाचा कार्यभार प्रभारी अधिकाऱ्यांमार्फतच करावा लागणार आहे.त्यामुळेच विद्यापीठाने अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार पूर्वी काम करत असलेल्या पदाधिकाऱ्यांकडे सोपवल्याचे बोलले जात आहे. 
---------------------------------------------