बारावीच्या निकालात ग्रामीणमध्ये 'इंदापूर' तर शहरात पीसीएमसी अव्वल

इंदापूर तालुक्याचा निकाल ९५.३० टक्के असून पीसीएमसीचा निकाल ९३.२८ टक्के लागला आहे. तर मावळ तालुक्याचा निकाल सर्वात कमी ८७.२८ टक्के लागला आहे.

 बारावीच्या निकालात ग्रामीणमध्ये 'इंदापूर' तर शहरात पीसीएमसी अव्वल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education) इयत्ता बारावीचा (12 th result)  निकाल जाहीर करण्यात आला असून पुणे जिल्ह्यात इंदापूर (indapur )तालुक्याने निकालात बाजी मारली असून शहरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (PCMC) अव्वल स्थान पटकावले आहे. इंदापूर तालुक्याचा निकाल ९५.३० टक्के असून पीसीएमसीचा (PCMC) निकाल ९३.२८ टक्के लागला आहे. तर मावळ तालुक्याचा निकाल सर्वात कमी ८७.२८ टक्के लागला आहे.
 विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराचा निकाल सोलापूर व अहमदनगर जिल्ह्याच्या तुलनेत कमी आहे. सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९३. ६९ टक्के अहमदनगर जिल्ह्याचा निकाल ९३.६३% तर पुणे विभागाचा निकाल ९१.१४ टक्के एवढा लागला आहे. पुणे विभागातील एक लाख १ लाख १९ हजार २९७ विद्यार्थी तर अहमदनगर जिल्ह्यातील ५८ हजार १२० विद्यार्थी आणि सोलापूर जिल्ह्यातील ५० हजार ३३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.                        

पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्याचा निकाल ९३.५६ टक्के, बारामतीचा निकाल ९३.७३ टक्के भोरचा निकाल ९३.७७ टक्के, दौंडचा निकाल ९२.९१ टक्के, हवेली तालुक्याचा निकाल ९२.२६ टक्के ,इंदापूरचा निकाल ९५.३० टक्के, जेजुरीचा निकाल ९१.९६ टक्के, खेडचा निकाल ९०.८४ टक्के, मावळचा निकाल ८७.२८ टक्के, मुळशीचा निकाल ९४.३९ टक्के, पुणे सिटी वेस्टचा निकाल ८८.६४ टक्के , पुरंदरचा निकाल ९३.१८ टक्के, शिरूर तालुक्याचा निकाल ९४.७७ टक्के, वेल्हे तालुक्याचा निकाल ९४.१७ टक्के, पुणे सिटी ईस्टचा निकाल ८८.२४ टक्के तर पीसीएमसीचा निकाल ९३.२८ टक्के एवढा लागला आहे.                              

         पुणे सिटी वेस्ट मधून २८ हजार १०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील २४ हजार ९११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.तर पुणे सिटी ईस्ट मधून २४ हजार ४२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील २४ हजार २५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर त्यातील २१ हजार ४२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील १८ हजार ५४२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील १८ हजार ४३५ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले यामधून १७ हजार १९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व तालुक्यात मुलांच्या उत्तीर्णतेच्या तुलनेत मुलींची टक्केवारी अधिक असल्याचे दिसून येत आहे.