डीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी यंदाही फिरवली पाठ; केवळ १४ हजार अर्ज

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात शिक्षक भरती होऊ शकली नाही. संच मान्यतेच्या आधारे शिक्षक भरती राबविली जाणार असल्याचे शिक्षण विभागातर्फे वेळोवेळी जाहीर करण्यात आले.

डीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी यंदाही फिरवली पाठ; केवळ १४ हजार अर्ज
Maharashtra D.El.Ed Admissions 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

D.Ed. Admissions 2023 : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे (School Education Department) डी. एल.एड.(डीएड) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून नुकतीच प्रवेश अर्ज करण्याची मुदत संपली. यंदा डीएड प्रवेशासाठी केवळ १३ हजार ७९९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे यावर्षी सुद्धा अर्ज करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात शिक्षक भरती (Teachers Recruitment) होऊ शकली नाही. संच मान्यतेच्या आधारे शिक्षक भरती राबविली जाणार असल्याचे शिक्षण विभागातर्फे वेळोवेळी जाहीर करण्यात आले. परंतु, अद्याप संच मान्यतेच्या प्रक्रियेला अंतिम स्वरूप प्राप्त झालेले नाही. त्यामुळे अजूनही शिक्षक भरती संदर्भात राज्य शासनाकडून ठोस निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.

ICAI CA Result : सीए परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, असा पाहा निकाल

या पार्श्वभूमीवर डी.एड. अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्याचाच परिणाम डी.एड. प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थी संख्येवर दिसून येत आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून डी.एड. प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. राज्यातील ३१ हजार १०७ जागांसाठी केवळ १३ हजार ७९९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. येत्या ७ जुलै रोजी चेकलिस्ट प्रसिद्ध केली जाणार असून ११ जुलैला पहिली प्रवेश यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD