पानशेतनंतर पुण्यात आणखी चार क्लस्टर शाळा

राज्यातील कमी पट संख्येच्या १४ हजार ७८३ शाळा असून या शाळांचे रूपांतर क्लस्टर स्कूलमध्ये करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

पानशेतनंतर पुण्यात आणखी चार क्लस्टर शाळा
Cluster School Panshet

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 

पानशेत (Panshet) येथील क्लस्टर शाळेचा (Cluster Schools) पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्याचे पाहून शालेय शिक्षण विभागाने (School Education Department) राज्यातील सर्व कमी पटसंख्येच्या शाळांचे रूपांतर क्लस्टर स्कूल (समूह शाळा) मध्ये करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यावरून विरोधकांनी व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी टीकेची झोड उठवली. परंतु, पानशेतनंतर पुण्यात (Pune District) पासली खो-यात आंबेगाव परिसरात, भोरमध्ये आणि पाबळ जवळ प्रत्येकी एक अशा आणखी चार क्लस्टर शाळा सुरू करता येऊ शकतात. याबाबत प्राथमिक चाचपणी झाली असली तरी त्यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नाही, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

 

राज्यातील कमी पट संख्येच्या १४ हजार ७८३ शाळा असून या शाळांचे रूपांतर क्लस्टर स्कूलमध्ये करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे या शाळांमधील १ लाख ८५ हजार ४६७ विद्यार्थ्यांना क्लस्टर स्कूलमध्ये शिक्षण घ्यावे लागणार आहे. तसेच या शाळांमधील २९ हजार ७०७ शिक्षकांना इतर शाळांमध्ये समाविष्ट करून घ्यावे लागणार आहे. 

शालार्थ आयडीसाठी जाचक अट केली रद्द; उप सचिवांनी काढले आदेश

 

क्लस्टर स्कूल सध्या वादाचा मुद्दा ठरत असला तरी येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत क्लस्टर स्कूल संदर्भातील प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्त कार्यालयाने दिल्या आहेत. त्यामुळे पुढील काळात पुण्यासह सर्व जिल्ह्यात क्लस्टर शाळांच्या संख्येत वाढ होणार आहे. पानशेतसह इतर चार ठिकाणी क्लस्टर शाळा सुरू करणे शक्य आहे, असा अहवाल शिक्षण विभागाकडे देण्यात आला होता. त्यामुळे उर्वरित शाळांचे रूपांतर पुढील एक दोन वर्षात क्लस्टर शाळेत होऊ शकते, असे जिल्हा परिषदेतील काही पदाधिकारी सांगत आहेत.

 

पुणे जिल्ह्यात कमी पटाच्या शाळांची संख्या १ हजार ५४ एवढी आहे. मात्र,या सर्व शाळा बंद होणार नाहीत. तर त्यातील ३० ते ४० टक्के शाळांचे रूपांतर क्लस्टर शाळेत होणार आहे. रायरेश्वर सारख्या अतिदूर्गम भागातील शाळा सुरूच राहणार आहेत. मात्र, पासली खो-यात आंबेगाव परिसरात, भोरमध्ये आणि पाबळ जवळ कमी पटाच्या शाळांचे रूपांतर क्लस्टर शाळेत करण्याबाबतची चाचपणी पूर्वीच झाली आहे. त्यामुळे पानशेतनंतर कोणत्या शाळेचा क्रमांक लागणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

सध्या क्लस्टर शाळेला विरोध होत असल्याने त्यावर हालचाली केल्या जाणार नाहीत. परंतु, वातावरण काहीसे शांत झाल्यावर त्यादृष्टीने निर्णय घेतले जाणार आहेत. तसेच क्लस्टर शाळेसंदर्भात तयार करण्यात आलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करूनच शाळा सुरू केल्या जातील, असेही जिल्हा परिषदेतील पदाधिकारी सांगत आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j