परीक्षा विभागाच्या त्या कारभाराची होणार चौकशी

विद्यापीठाच्या विस्कळीत झालेल्या शैक्षणिक वेळापत्रकामुळे परीक्षा लांबल्या असून त्याचा परिणाम पुढील शैक्षणिक वर्षावर होत आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना गुणपत्रिका व इतर कागदपत्र मिळण्यास अडचणी येत असल्याने अनेक सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले.

परीक्षा विभागाच्या त्या कारभाराची होणार चौकशी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कारभारावर शनिवारी अधिसभा सदस्यांनी असंतोष व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा विभागाच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने उपाय योजना सुचवण्यासाठी समितीची स्थापना केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय आधिसभेच्या बैठकीत शनिवारी कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांच्या अभिभाषनानंतर आधिसभा सदस्यांनी परीक्षा विभागातील कामकाजावर विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष वेधले. विद्यापीठाच्या विस्कळीत झालेल्या शैक्षणिक वेळापत्रकामुळे परीक्षा लांबल्या असून त्याचा परिणाम पुढील शैक्षणिक वर्षावर होत आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना गुणपत्रिका व इतर कागदपत्र मिळण्यास अडचणी येत असल्याने अनेक सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले.

विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या पहिल्या सत्राच्या परीक्षांचा निकाल येथे एप्रिल- मे महिन्यात जाहीर होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या सत्राच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. कोरोनानंतर विस्कळीत झालेले शैक्षणिक वर्ष यावर्षी सुध्दा रुळावर येणार नसल्याचे दिसून येत आहे. मात्र ,यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्यासाठी विद्यापीठाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आधिसभा सदस्यांनी केली. अधिसभा सदस्य विनायक आंबेकर यांच्यासह इतर सदस्यांनी परीक्षा विभागाच्या कामकाजावर आक्षेप घेत तीव्र नाराजी व्यक्त केली.

     विद्यार्थ्यांना गुणपत्रिका व इतर कागदपत्र मिळवण्यासाठी पैशाची मागणी केली जात असल्याची लेखी तक्रार नुकतीच एका विद्यार्थ्यांने केली होती. परंतु, त्यानंतरही विद्यापीठाच्या कामकाजात सुधारणा झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे अधिसभा सदस्यांच्या मागणीनुसार परीक्षा विभागातील एकूण कामकाजाची चौकशी करण्यासाठी डॉ.कारभारी काळे यांनी डॉ.राजेद्र विखेपाटील यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापना केली. या समितीत प्रसेनजेत फडणवीस, विनायक आंबेकर, डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, डॉ.अपूर्व हिरे, राहुल पाखरे, बाळासाहेब सागडे, आणि कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांचा समावेश करण्यात आला. या समितीचा कार्यकाल दोन महिन्यांचा असेल, असे प्र कुलगुरु डॉ.संजीव सोनवणे यांनी यावेळी स्पष्ट केले.