ब्ल्यु बेल्स शाळांच्या पार्श्वभूमीवर आता या शाळाही शिक्षण विभागाच्या रडारवर  

ब्ल्यू बेल्स शाळेकडे बोगस शाळा मान्यता प्रमाणपत्र आढळून आले. त्याचा प्रमाणे इतरही शाळांकडे अशाच प्रकारची बोगस कागदपत्र आहेत का? हे तपासले जाणार आहे.

ब्ल्यु बेल्स शाळांच्या पार्श्वभूमीवर आता या शाळाही शिक्षण विभागाच्या रडारवर  

         दहशतवादी कृत्यासाठी वापरण्यात आलेली ब्ल्यू बेल्स शाळा (Blue Bells schools) अनधिकृत असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता पुणे विभागातील राज्य मंडळाच्या (State Board) स्वयंम अर्थसहाय्यित शाळांची (self finance School) तपासणी केली जाणार आहे. पुण्यातील इतर सर्व राज्य मंडळांच्या स्वयंम अर्थसहाय्यित शाळांची तपासणी करण्याच्या सूचना पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे (Deputy Director Audumbar Ukirde) यांनी संबंधितांना दिल्या आहेत.                            

   राज्यातील सुमारे ८०० हून अधिक शाळा अनधिकृत असल्याची माहिती शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीतून समोर आली. या शाळांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र संबंधित शाळांना बोगस कागदपत्र पुरवणाऱ्या टोळीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. सीबीएसई बोर्डाच्या शाळेची तपासणी केल्यानंतर त्यातील अनेक शाळांकडे आवश्यक कागदपत्र नसल्याचे समोर आले. त्यात आता ब्ल्यू बेल्स ही राज्य मंडळाची स्वयंम अर्थसहाय्यित शाळा  सुध्दा अनधिकृत असल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्य मंडळाच्या इतरही स्वयंम अर्थसहाय्यित शाळांची तपासणी करावी लागेल, असे औदुंबर उकिरडे यांनी सांगितले.                                 

      उकिरडे म्हणाले, पुण्यात राज्य मंडळाच्या सुमारे २०० स्वयंम अर्थसहाय्यित शाळा आहेत. या शाळांची तपासणी करण्याच्या सूचना शिक्षण अधिका-यांना दिल्या आहेत. ब्ल्यू बेल्स शाळेकडे बोगस शाळा मान्यता प्रमाणपत्र आढळून आले. त्याचा प्रमाणे इतरही शाळांकडे अशाच प्रकारची बोगस कागदपत्र आहेत का? हे तपासले जाणार आहे.