बारा तास रुग्णालयात नोकरी अन् रात्री शाळेत; बारावीच्या परीक्षेत मुस्कान पहिली

मुस्कान ही आबासाहेब अत्रे रात्र शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी. या महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल ६१ टक्के इतका लागला आहे.

बारा तास रुग्णालयात नोकरी अन् रात्री शाळेत; बारावीच्या परीक्षेत मुस्कान पहिली
Muskan Shaikh

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल गुरूवारी जाहीर केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या जिद्दीच्या, मेहनतीच्या कहाण्या समोर येत आहेत. मुस्कान जाहीर शेख ही विद्यार्थिनीही त्यापैकीच एक. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे सात वर्षांपुर्वी शिक्षण अर्धवट सोडले. यंदा परीक्षा दिली पण रात्र शाळेतून. रुग्णालयात बारा तासांची ड्युटी करत तिने नेटाने अभ्यास केला अन् शाळेत पहिला क्रमांक पटकावला आहे.

मुस्कान ही आबासाहेब अत्रे रात्र शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी. या महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल ६१ टक्के इतका लागला आहे. मुस्कानने ६६.१७ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतूक होत आहे.

विद्यार्थ्यांनो, पुरवणी परीक्षेच्या तयारीला लागा! सोमवारपासून अर्ज भरता येणार

रात्र शाळेमध्ये एकूण ३४ विद्यार्थी होते. त्यापैकी २८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुस्कान प्रथम श्रेणीत तर १२ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी मिळाली. मुस्कान पाठोपाठ प्रियंका सुरेश कुचेकर हिने ५७.५० टक्के आणि अनिकेत वसंत तांबे याने ५७.३३ गुणांसह अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला आहे.

२३ वर्षीय मुस्कान ही हॉस्पिटलमध्ये मुक्काम करून रात्र शाळेत शिकण्यासाठी येत असायची. या यशाबद्दल बोलताना ती म्हणाली, माझ्या घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मी माझे शिक्षण पूर्ण करू शकले नाही. परंतु मी सात वर्षांनंतर परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले आहे. मी रुग्णालयामध्ये १२ तासांची ड्युटी करून रात्र शाळेत जायचे. मी माझ्या जिद्दीने, चिकाटीने रात्रंदिवस अभ्यास करून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. मला माझ्या कॉलेजमधून खूप सहकार्य मिळाले. मुख्याध्यापक, वर्गशिक्षकांकडून सहकार्य मिळाले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo