शैलजा दराडेंना भोवले ‘हे’ प्रकरण! सूरज मांढरे यांच्या अहवालानंतरच निलंबन

शालेय शिक्षण विभागाचे उप सचिव टि. वा. करपते यांनी नुकताच दराडे यांच्या निलंबनाचा आदेश काढला आहे.

शैलजा दराडेंना भोवले ‘हे’ प्रकरण! सूरज मांढरे यांच्या अहवालानंतरच निलंबन
Shailaja Darade Suspension

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (MSCE) प्रभारी आयुक्त शैलजा दराडे (Shailaja Darade) यांना राज्य सरकारने निलंबित केले आहे. दराडे यांच्यासह भावाविरुध्द हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) फेब्रुवारी महिन्यातच फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात त्यांचा अटकपूर्व जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. तसेच शिक्षण आयुक्त सूरत मांढरे (Suraj Mandhare) यांनी सात जुलै रोजी सरकारला दिलेल्या अहवालात गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. हा अहवाल दराडे यांच्या निलंबनासाठी महत्वाचा ठरल्याची चर्चा शिक्षण विभागात (Education Department) सुरू आहे.

शालेय शिक्षण विभागाचे उप सचिव टि. वा. करपते यांनी नुकताच दराडे यांच्या निलंबनाचा आदेश काढला आहे. शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या अमिषाने रकमा घेऊन, नोकरी न लावता फसवणूक केल्याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात दराडे यांच्यावर २२ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४ (१) (क) अन्वये दराडे यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

RTE Admission : शुल्क प्रतिपूर्ती रकमेत वाढ होणार की नाही? संस्थाचालक हवालदिल

नेमके काय आहे प्रकरण?

शिक्षण संचालक म्हणून कार्यरत असताना राज्यातील 45 शिक्षकांकडून प्रत्येकी 12 ते 14 लाख रुपये घेतल्याचा आरोप दराडे यांच्यासह भावावर करण्यात आला आहे. पोपट सुखदेव सूर्यवंशी (रा. खानजोडवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर) असे शैलजा दराडे यांच्या भावाचे नाव आहे. हा प्रकार १५ जून २०१९ पासून सुरु होता, असे तक्रारीत म्हटले आहे.

दादासाहेब दराडे याने त्यांची बहीण शैलजा दराडे या शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी असल्याचे सांगून पोपट सूर्यवंशी यांना विश्वासात घेतले. सूर्यवंसी यांच्या दोन नातेवाईकांना शिक्षक म्हणून नोकरी लावतो, असे सांगत त्यांच्याकडून प्रत्येकी १२ लाख आणि १५ लाख रुपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पैसे देऊनही नोकरी मिळत नसल्याने सूर्यवंशी यांनी  पैसे परत करण्याची मागणी केली. पण पैसे परत न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

दराडे यांनी दिली होती जाहीर नोटीस

शैलजा दराडे यांनी त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे याच्याशी काहीही संबंध नसल्याची जाहीर नोटीस ऑगस्ट २०२० मध्ये दिली होती. आपण सरकारी अधिकारी असल्याचा गैरफायदा घेऊन ते कामे करून देण्याबाबत सांगत आहेत. या गैरकृत्याबाबत दादासाहेब दराडे यांना असे न करण्याबाबत अनेकदा तंबी व सूचना दिलेली आहे. त्यानंतर ते लोकांना फसवत आहेत. त्यामुळे त्याच्यासोबत कसलाही व्यवहार करु नये, नोटीसीत म्हटले होते.

काय म्हटले आहे निलंबनाच्या आदेश?

निलंबनाच्या आदेशात हडपसर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा उल्लेख करण्यात आला आहे. शिक्षण आयुक्तांनी सात जुलै रोजी सादर केलेल्या अहवालानुसार दराडे यांनी केलेली कृती ही त्यांच्या कार्यपध्दतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, पुणे यांनी दराडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. तसेच निलंबित असताना त्यांना खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. असेही म्हटले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD