'अभाविप'च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक १८ वर्षांनंतर पुण्यात

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पुण्यात महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या प्रांगणात दि. २५ मे ते २८ मे यादरम्यान होणार आहे.

'अभाविप'च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक १८ वर्षांनंतर पुण्यात
ABVP Pune Meeting

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची (ABVP) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पुण्यात (Pune) महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या (Maharshi karve Stree shikshan Samstha) प्रांगणात दि. २५ मे ते २८ मे यादरम्यान होणार आहे. या बैठकीत विद्यार्थी परिषदेचे काम करणारे देशभरातील राष्ट्रीय कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. दरवर्षी देशभरातील विविध शहरांमध्ये ही बैठक पार पडत असते. या वर्षी हा मान पुणे शहराला मिळाला आहे.

पुणे शहरात ही बैठक २००६ मध्ये झाली होती. तब्बल १८ वर्षांनंतर ही बैठक पुण्यात होत आहे. मंगळवारी (दि. १६ मे) ला बैठकीसंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी ठकीच्या स्वागत समितीची घोषणा करण्यात आली. अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी स्वागत समिती सचिव म्हणून बागेश्री मंठाळकर यांच्या नावाची घोषणा केली. तर मंठाळकर यांनी स्वागत समिती सहसचिव म्हणून राहूल पांगरीकर (सचिव, विद्यार्थी निधी ट्रस्ट) तसेच स्वागत समिती अध्यक्ष म्हणून बाबा कल्याणी (चीफ मॅनेजिंग डायरेक्टर, भारत फोर्ज) व उपाध्यक्ष म्हणून संजय चोरडिया (अध्यक्ष, सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट,पुणे) व प्रकाश धोका (प्रसिद्ध उद्योजक) यांच्या नावाची घोषणा केली.

हेही वाचा : ‘सारथी’कडून सुवर्णसंधी : एम.फील., पीएच.डी. साठी मिळवा आर्थिक सहाय्य

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीसाठी संपूर्ण देशभरातून जे कार्यकर्ते येणार आहेत त्यांच्या स्वागतासाठी तसेच त्यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवून देण्यासाठी दि. २६ मे रोजी नागरिक समारोह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी माजी सीडीएस मनोज नरवणे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

यंदा अभाविपचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू असल्याने ही राष्ट्रीय कार्यकारीणी बैठक देखील संगठनात्मक दृष्टीने महत्त्वाची आहे. देशभरातील प्रत्येक राज्यातून त्या ठिकाणी अभाविपचे प्रतिनिधित्व करत असलेले कार्यकर्ते, अखिल भारतीय पदाधिकारी, काही विशेष निमंत्रित सदस्य आणि नेपाळ मधील प्रतिनिधी देखील या बैठकीस अपेक्षित आहेत. या बैठकीत देशभरातील वर्तमान स्थिती, शैक्षणिक सद्यस्थिती यावर चर्चा केली जाते आणि त्यावर अभाविपची भूमिका ठरवली जाते, अशी माहिती अभाविप राष्ट्रीय मंत्री अंकिता पवार यांनी दिली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2