पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घुसून ABVP चा राडा

रॅपर शुभम जाधव याने विद्यापीठाच्या आवारासह ऐतिहासिक इमारतीत रॅप साँग चित्रित केले आहे. या गाण्यामध्ये शिव्यांचा भडिमार करण्यात आला आहे.

पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घुसून ABVP चा राडा
ABVP Protest in SPPU

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घुसून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी सोमवारी आंदोलन केले. विद्यापीठात चित्रित करण्यात आलेल्या रॅप साँगविरोधात (Rap Song) अभाविपकडून आक्रमक भूमिका घेत विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले. व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू असताना छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घुसून तोडफोड करण्यात आली आहे. कागदाचे तुकडे सदस्यांच्या अंगावर भिरकवण्यात आल्याने विद्यापीठातील वातावरण चांगलेच तापले होते.

रॅपर शुभम जाधव याने विद्यापीठाच्या आवारासह ऐतिहासिक इमारतीत रॅप साँग चित्रित केले आहे. या गाण्यामध्ये शिव्यांचा भडिमार करण्यात आला आहे. तसेच कुलगुरू बसतात त्या खुर्चीवर बसून हातात तलवार, टेबलवर दारुची बाटली, ग्लास, पिस्तुल ठेवून गाणे तयार करण्यात आले आहे. यावरून बराच वाद निर्माण झाला असून राजकीय नेत्यांनी या वादात उडी घेतली आहे.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

अभाविपने सोमवारी याप्रकरणी विद्यापीठात आंदोलन केले. सकाळी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू होती. ही बैठक सुरू असतानाच अभाविपचे कार्यकर्त्यांनी सभागृहात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दरवाजाच्या काचा फुटल्या. त्यानंतर आत आल्यानंतर कार्यकर्त्यांनी कागदाचे तुकडे भिरकावले.

रॅपर जाधवसह त्याचे सहकारी, कुलसचिव प्रफुल्ल पवार तसेच सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. कुलसचिवांनी तोंडी परवानगी दिल्याचे जाधवकडून सांगितले जात आहे. याबाबत कार्यकर्त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. थेट व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मागील काही वर्षांत पहिल्यांदाच आंदोलन झाल्याने पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. दरम्यान, रॅप साँग प्रकरणाच्या चौकशीसाठी विद्यापीठ प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच समिती स्थापन केली आहे.