स्पर्धा परीक्षेला गेला अन् बॅग, मोबाईल चोरला; बेरोजगार तरुणाचे मानसिक तणावातून कृत्य

तरूण कात्रज येथील असून मागील आठवड्यात हडपसर परिसरातील रामटेकडी येथील डिजिटल हबमध्ये एका स्पर्धा परीक्षेसाठी गेला होता.

स्पर्धा परीक्षेला गेला अन् बॅग, मोबाईल चोरला; बेरोजगार तरुणाचे मानसिक तणावातून कृत्य
Wanawadi Police Station

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नोकरी नसल्याच्या मानसिक तणावातून एका उच्च शिक्षित तरूणाने (Unemployed Youth) विद्यार्थ्यांचे बॅग व मोबाईल चोरल्याची घटना समोर आली आहे. चोवीस वर्षीय या तरूणाला पुण्यातील वानवडी पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. रामटेकडी येथील डिजिटल हबमध्ये (Digital Hub) हा प्रकार घडला आहे. हा तरूण सराईत चोरटा नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरूण कात्रज येथील असून मागील आठवड्यात हडपसर परिसरातील रामटेकडी येथील डिजिटल हबमध्ये एका स्पर्धा परीक्षेसाठी गेला होता. परीक्षा संपल्यानंतर त्याने परीक्षा केंद्राबाहेर असलेल्या इतर परीक्षार्थी विद्यार्थ्यांची बॅग व एका विद्यार्थ्याचा मोबाईल चोरून नेला. या विद्यार्थ्यांनी बॅग व मोबाईल हरवल्याची तक्रार वानवडी पोलिसांकडे केली.

हेही वाचा : विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! UPSC कडून २४ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

पोलिसांनी केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपी बाईकवरून पळून जाताना दिसून आला. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून रविवारी या तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीमध्ये त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांना चोरलेला मोबाईल, कॅलक्युलेटर आणि एक बॅग त्याच्या घरी सापडली. त्याची दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.

आरोपी तरुण उच्च शिक्षित असून सध्या एका कंपनीत अप्रेन्टिसशिप करत आहे. तो सराईत गुन्हेगार नाही. मानसिक तणावाखाली त्याने हे कृत्य केले आहे. चांगली नोकरी नसल्याने तो तणावात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2