दीपक केसरकर : बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ६०/ ४० चा फॉर्म्युला ? 

इयत्ता बारावीच्या ४० टक्के आणि सीईटीच्या ६० टक्के गुणांना महत्त्व देऊन व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा,अशा सूचना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.

दीपक केसरकर : बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या  प्रवेशासाठी ६०/ ४० चा फॉर्म्युला ? 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इयत्ता बारावीनंतरच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी (professional courses) केवळ सीईटीच्या गुणांच्या आधारेच प्रवेश दिला जातो.त्यामुळे विद्यार्थी बारावीच्या नियमीत अभ्यासक्रमाकडे दूर्लक्ष करून केवळ सीईटीकडेच लक्ष देतात.परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे इयत्ता बारावीच्या ४० टक्के (12th 40 % ) आणि सीईटीच्या ६० टक्के (CET 60%) गुणांना महत्त्व देऊन व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा,अशा सूचना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Maharashtra School Education Minister Deepak Kesarkar) यांनी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.

हेही वाचा: शासनाचा उफराटा कारभार; कनिष्ठ पदासाठी पदवी अन् वरिष्ठ पदासाठी पदविका पात्रता, भरती वादात

शालेय शिक्षण व साक्षरता विभागातर्फे आयोजित उल्हास - नवभारत साक्षरता कार्यक्रमानिमित्त आयोजित क्षेत्रीय अधिकारी यांच्या राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना केसरकर बोलत होते.यावेळी राज्याचे शालेय शिक्षण सचिव रणजित सिंह देओल , शिक्षण आयुक्त सूरज मांढरे , महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे आदी उपस्थित होते.

इयत्ता बारावी व सीईटी परीक्षेच्या प्रत्येकी ५० टक्के गुणांच्या आधारे व्यावसायीक अभ्यासक्रमांना प्रवेश देण्याबाबत मागील सरकारच्या काळात सकारात्मक चर्चा झाली होती.मात्र, सरकार पडल्याने त्यावर निर्णय व अंमलबजावणी होऊ शकली नाही.मात्र, आता यावर पुन्हा एकदा शासनाकडे प्रस्ताव सादर करावा,अशा सूचना केसरकर यांनी दिल्या आहेत.उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.

केसरकर म्हणाले,विद्यार्थी केवळ खासगी क्लासमध्ये प्रवेश घेऊन सीईटी किंवा जेईई ,नीट सारख्या प्रवेश पूर्व परीक्षांची तयारी करत असल्याचे दिसून येते.मात्र,क्लास चालकांनी शाळा ,कॉलेज यांच्याशी छुपे करार करण्यापेक्षा स्वत:च्या शाळा सुरू कराव्यात.शासनाकडून त्यांना मान्यता दिली जाईल.त्याचाप्रमाणे शाळा मान्यतेपासून सर्वच गोष्टी ऑनलाईन पध्दतीने करण्याचे काम सुरू आहे.

विद्यार्थ्यांच्या हजरीबाबत बोलताना केसरकर म्हणाले,अत्याधुनिक साधनांचा वापर करून केवळ फेस रीडिंगकरून विद्यार्थ्यांची हजेरी घेण्याबाबत यंत्रणा बसवण्याविषयी शासन विचार करत आहे.लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल.विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही शासनाची प्राथमिकता आहे,असेही केसरकर म्हणाले.