5th, 8th scholarship : शिक्षण विभागाला स्वतःच्याच निर्णयाचा विसर ; शिष्यवृत्ती परीक्षा प्रक्रिया लांबणीवर 

जुलै महिन्यापासूनच शिष्यवृत्ती परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार होती. परंतु, ऑगस्ट महिना उजाडला तरी सुद्धा याबाबत अद्याप कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत.

5th, 8th scholarship : शिक्षण विभागाला स्वतःच्याच निर्णयाचा विसर ; शिष्यवृत्ती परीक्षा प्रक्रिया लांबणीवर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे व त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे (Maharashtra State Council Of Examination) इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा (5th, 8th scholarship examination) घेतली जाते. शिक्षण विभागातर्फे (education department) यंदा जुलै महिन्यापासूनच शिष्यवृत्ती परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया (Scholarship exam form process) सुरू केली जाणार होती. परंतु, ऑगस्ट महिना उजाडला तरी सुद्धा याबाबत अद्याप कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेबाबत शिक्षण विभाग गंभीर नसल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : शिक्षण 11th Admission : विशेष फेरीनंतरही पुण्यात ५० हजार जागा रिक्त, आजपासून दुसरी फेरी

शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाचा मागवा घेतला असता गेल्या काही वर्षात निकालाच्या टक्केवारीत मोठी घट झाल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही चांगलीच घटली आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेची प्रक्रिया एक जुलैपासून सुरू करण्याचे नियोजन राज्य परीक्षा परिषदेने केले होते. याबाबत प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, तत्कालीन माध्यमिक शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील तसेच तत्कालीन परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ.महेश पालकर यांची संयुक्तिक बैठक झाली होती. त्यानुसार शिक्षण विभागाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना दिल्या होत्या. मात्र, ऑगस्ट महिना उजाडला तरीही शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही. 

 नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या  निकालात काही जिल्ह्यांमध्ये मंजूर असलेल्या संचाएवढे विद्यार्थी सुद्धा शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले नाहीत. तसेच अनेक जिल्ह्यांचा निकाल पाच ते दहा टक्क्यांच्या आत आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता घटली असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळेच शिष्यवृत्ती परीक्षेत अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रविष्ट करून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला होता. परंतु ,केवळ निर्णय झाला. या निर्णयाच्या अंमलबजावणीचा मात्र विसर पडला आहे.

दरम्यान, परीक्षा परिषदेच्या अध्यक्ष व आयुक्त पदी आणि माध्यामक शिक्षण संचालक पदी नवे अधिकारी आले आहेत.पूर्वी घेतलेल्या निर्णयांची या अधिका-यांना कल्पना नसल्याचे त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर आढळून आले. 

     परीक्षा घेणाऱ्या एजन्सीचा घोळ ?

परीक्षा परिषदेकडून घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांसाठी राज्य शासनातर्फे एक एजन्सी नियुक्त केली जाते. सध्या परीक्षा परिषदेचे काम पाहणाऱ्या एजन्सीचा कालावधी फेब्रुवारी २०२४ पूर्वी संपणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. त्यामुळे सध्या कार्यरत असलेलया एजन्सीकडून परीक्षा घ्यावी की नव्या एजन्सीची नियुक्ती करावी, याबाबत परिषदेच्या अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अद्याप शिष्यवृत्ती परीक्षा अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकली नसावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.