SSC Result : पुरवणी परीक्षा, गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकनाचे घरबसल्या भरा अर्ज; इथे वाचा सविस्तर माहिती

गुणपडताळणीसाठी दि. ३ जून ते दि. १२ जून पर्यंत व छायाप्रतीसाठी दि. ३ जून  ते दि. २२ जून पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीनेच शुल्कही भरता येईल.

SSC Result : पुरवणी परीक्षा, गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकनाचे घरबसल्या भरा अर्ज; इथे वाचा सविस्तर माहिती
SSC Result Update

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (SSC Board) इयत्ता दहावीचा निकाल (10th Result) शुक्रवारी (दि. २ जून) जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी (Marks Verification) व पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रियाही मंडळाकडून सुरू केली जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रियाही ऑनलाईन असून विद्यार्थ्यांना घरबसल्या अर्ज करता येणार आहेत. (Maharashtra Board 10th Result Update)

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

मोठी बातमी : दहावीचा निकाल २ जून रोजी; राज्य मंडळाने केली अधिकृत घोषणा

यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी दि. ३ जून ते दि. १२ जून पर्यंत व छायाप्रतीसाठी दि. ३ जून  ते दि. २२ जून पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीनेच शुल्कही (Debit Card / Credit Card/ UPI / Net Banking) भरता येईल.

मार्च २०२३ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसांपासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

नक्षलवाद्यांसोबत राहून बंदुकीशी खेळणाऱ्या राजुलाचा बारावीच्या परीक्षेत यशस्वी लक्ष्यभेद

ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. दहावीच्या परीक्षेला सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी (जुलै-ऑगस्ट २०२३ व मार्च २०२४) श्रेणी / गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील. दरम्यान, विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या माध्यमिक शाळेमार्फत दि. १४ जून रोजी दुपारी तीन वाजता वितरित करण्यात येतील.

 पुरवणी परीक्षेसाठी सात जूनपासून प्रक्रिया

जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये आयोजित करण्यात येणाच्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी दि. ७ जूनपासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती ओक यांनी दिली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2