विद्यार्थ्यांची भाषा अन् गणिताची कसोटी; परीक्षेतून समजणार गुणवत्ता, लवकरच अहवाल 

देशभरात स्टेट एज्युकेशन अचिव्हमेंट सर्व्हे (एसईएएस) २०२३ हे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी ही परीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्रात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत परीक्षा घेण्यात आली.

विद्यार्थ्यांची भाषा अन् गणिताची कसोटी; परीक्षेतून समजणार गुणवत्ता, लवकरच अहवाल 
SEAS 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इयत्ता तिसरी, सहावी व नववीतील विद्यार्थ्यांची भाषा (Language) व गणित (Mathematics) विषयांची बौध्दिक क्षमता तपासण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय व राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (NCERT) शुक्रवारी (दि. ३) देशभरात परीक्षा (Examination) घेण्यात आली. पुणे जिल्ह्यात जवळपास अठराशे शाळांमधील ५४ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक संपादणूक तपासली जाणार असून त्यानुसार विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

 

देशभरात स्टेट एज्युकेशन अचिव्हमेंट सर्व्हे (SEAS) २०२३ हे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी ही परीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्रात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (SCERT) परीक्षा घेण्यात आली. पुणे जिल्ह्यातील (Pune District) एकूण ७ हजार २०० शाळांपैकी १ हजार ८०७ शाळांमधील ५४ हजार विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी निवड करण्यात आली होती. मराठी, इंग्रजी, उर्दू आणि कन्नड या माध्यमातून ही परीक्षा घेतली गेली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसह खासगी संस्था तसेच स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील विद्यार्थ्यांचाही समावेश होता.

HSC Exam Update : इयत्ता बारावी परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत वाढविली

 

डाएट प्राचार्य शोभा खंदारे आणि बाळकृष्ण वाटेकर यांनी परीक्षेचे समन्वयक म्हणून काम पाहिले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील सुमारे ८० ते १०० शाळा या सर्वेक्षणासाठी निवडण्यात आल्या होत्या. सर्वेक्षणाच्या प्रश्नपत्रिकेबरोबरच विद्यार्थ्यांना अध्ययन व अध्यापनात काही अडचणी येतात का, यासंदर्भातही एक प्रश्नावली तयार करण्यात आली होती. ही प्रश्नावली विद्यार्थ्यांकडून भरून घेण्यात आली.

 

ही परीक्षा ओएमआर शीटवर भरून घेण्यात आली. भाषा आणि गणित या दोन विषयांवर त्या-त्या वर्गातील प्राथमिक स्वरुपाचे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारण्यात आले होते. त्यातून विद्यार्थ्यांच्या संपादणूक कशी आहे, याबाबत निष्कर्ष काढण्यात येणार आहे. प्रत्येक तालुकानिहाय शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली जाणार आहे. याआधारे तालुक्यांची स्थिती समोर येणार असून शिक्षण पध्दतीत काय बदल करणे अपेक्षित आहे किंवा कोणत्या उपाययोजना राबविणे गरजेचे आहे, हे समजणार आहे. त्याआधारे विद्यार्थ्यांची भाषा व गणित विषयांची संपादणूक क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील.

 

विद्यार्थ्यांच्या ओएमआर शीट राज्यातील चार प्रमुख केंद्रांवर स्कॅन केल्या जाणार आहे. पुणे, नाशिक औरंगाबाद आणि नागपूर या चार केंद्रांवर राज्यभरातील सर्व विद्यार्थ्यांच्या ओएमआर शीट स्कॅन करून त्यांचा निकाल जाहीर केला जाईल. या निकालाच्या आधारे राज्याचा, जिल्ह्याचा आणि तालुकानिहाय अहवाल तयार केला जाईल. भाषा तसेच गणित या विषयांचा अहवालही स्वतंत्र असेल, अशी माहिती खंदारे यांनी दिली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k