किरणकुमार बोंदर यांच्यासह सर्व उच्च शिक्षण सहसंचालकांच्या बदल्या ;  केशव तुपे यांच्याकडे पुण्याचा पदभार 

किरणकुमार बोंदर यांची बदली नांदेड विभागीय सहसंचालक पदी करण्यात आली आहे. तर पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक पदी सध्याचे मुंबई विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. केशव तुपे यांची बदली करण्यात आली आहे.

किरणकुमार बोंदर यांच्यासह सर्व उच्च शिक्षण सहसंचालकांच्या बदल्या ;  केशव तुपे यांच्याकडे पुण्याचा पदभार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे (Department of Higher and Technical Education) विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांच्या बदल्या (Transfers of all Joint Directors of Higher Education ) करण्यात आल्या आहेत. त्यात पुणे विभागीय सहसंचालक किरणकुमार बोंदर (KiranKumar Bondar) यांचा समावेश असून उच्च शिक्षण संचालक कार्यालयातील डॉ.हरिभाऊ शिंदे (Dr. Haribhau Shinde) यांच्याकडेही अतिरिक्त कार्यभार दिला गेला आहे. पुणे, मुंबईसह सर्वच विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकाना इतरत्र पाठवण्यात आले असून काही सहसंचालकांचा कार्यभार संपुष्टात आणला गेला आहे.

हेही वाचा : SPPU News : विद्यापीठात सुरक्षा वाढवली; मुख्य प्रवेशद्वारावर नोंदणी, बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित

उच्च शिक्षण संचालनालयाअंतर्गत येणाऱ्या विभागीय सहसंचालकांच्या बदल्या केल्या जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून शिक्षण वर्तुळात सुरू होती. त्यात पुणे विभागीय सहसंचालक किरणकुमार बोंदर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, केवळ किरणकुमार बोंदर यांचीच नाही तर बहुतांश सर्व विभागीय सहसंचालकांच्या अतिरिक्त कार्यभाराचे ठिकाण बदलण्यात आले आहे. त्या संदर्भातील अध्यादेश उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आला आहे. बोंदर यांची बदली नांदेड विभागीय सहसंचालक पदी करण्यात आली आहे.तर पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक पदी सध्याचे मुंबई विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. केशव तुपे यांची बदली करण्यात आली आहे.

सोलापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.उमेश काकडे यांची बदली अमरावती विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक पदी करण्यात आली आहे. तर अमरावतीच्या विभागीय सहसंचालक डॉ.नलिनी टेंभेकर यांच्याकडे सोलापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक पदाचे कामकाज सोपविण्यात आले आहे. जळगाव येथील विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.संतोष चव्हाण यांना नागपूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयात पाठविण्यात आले आहे. तर नागपूर येथे कार्यरत असणारे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.संजय ठाकरे यांच्याकडे जळगाव सहसंचालक पदाची जबाबदारी दिली आहे.

मुंबई येथील एलफिस्टन महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.संजय जगताप यांच्याकडे कोकण विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला गेला आहे. तर उच्च शिक्षण संचालनालयातील वरिष्ठ प्रशासन अधिकारी डॉ.हरिभाऊ शिंदे यांच्याकडे मुंबई विभागाचा अतिरिक्त सहसंचालक पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. शिंदे यांच्याकडे देण्यात आलेला अतिरिक्त कार्यभार अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात पुढील आदेशापर्यंत चालू राहणार असल्याचे अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे. नांदेड विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.रामकृष्ण धायगुडे यांचा कार्यभार संपुष्टात आणला आहे.