प्राध्यापक संघटनेचा एनईपी अंमलबजावणीला नकार ; विद्यापीठांसमोर मांडणार भूमिका

विद्यापीठाकडून अद्याप अभ्यासक्रम तयार झालेले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची घाई न करता पुढील शैक्षणिक वर्षापासून 'एनईपी' ची अंमलबजावणी करावी.

प्राध्यापक संघटनेचा एनईपी अंमलबजावणीला नकार ; विद्यापीठांसमोर मांडणार भूमिका

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) विविध विषयांची अभ्यास मंडळे अस्तित्वात नाहीत. तसेच विद्या परिषदेवर (अकॅडमी कौन्सिल) अध्यक्ष निवडून गेलेले नाहीत.त्यात इयत्ता बारावीचा निकाल (12 result) लागला असून प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया ( first year admission process) सुरू होत आहे, अशा परिस्थितीत विद्यापीठाकडून अद्याप अभ्यासक्रम तयार झालेले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाच्या (national education policy -NEP) अंमलबजावणीची घाई न करता पुढील शैक्षणिक वर्षापासून 'एनईपी' ची अंमलबजावणी करावी, अशी एम फुक्टो (MFUCTO) या प्राध्यापक संघटनेची भूमिका आहे.

हेही वाचा : NEP 2020 Breaking News : संलग्न महाविद्यालयात अंमलबजावणी पुढील वर्षापासून

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रथम वर्ष प्रवेश द्यावेत, असे परिपत्रक विद्यापीठ प्रशासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रथम वर्षासाठी मेजर व मायनर विषय कसे असतील? या संदर्भातील अभ्यासक्रम आराखडा सुद्धा विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना जो अभ्यासक्रम शिकवायचा आहे तो अभ्यासक्रमाच अद्याप तयार झालेला नाही. त्यामुळे विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी बाबत घाई करू नये. पूर्ण तयारी झाल्यानंतरच पुढील शैक्षणिक वर्षापासून एनईपी अंमलबजावणीला सुरुवात करावी, अशी भूमिका प्राध्यापक संघटनेतर्फे विद्यापीठांसमोर मांडणार असल्याचे एम फुक्टो अध्यक्ष डॉ.एस. पी. लवांडे यांनी 'एज्युवार्ता ' शी बोलताना सांगितले. 

   लवांडे म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी बाबत राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने विविध अध्यादेश प्रसिद्ध केले असले तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी कशी करावी, याबाबत प्राचार्य व प्राध्यापकांना कोणतीही कल्पना दिलेली नाही. प्राध्यापकांच्या वर्कलोड संदर्भात अद्याप स्पष्टता आलेली नाही. एनईपीची अंमलबजावणी कशी करणार याची माहिती प्राध्यापकांना असल्याशिवाय ते विद्यार्थ्यांना समजून सांगू शकणार नाहीत. त्यातच अद्याप अभ्यासक्रमाच तयार झालेले नाहीत. विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याची  घाई केल्याने विद्यार्थ्यांचे व शैक्षणिक व्यवस्थेचे नुकसान होणार आहे. त्यामुळे एका वर्षानंतर एनईपीला सामोरे जावे, अशी भूमिका संघटनेतर्फे आम्ही विद्यापीठासमोर मांडणार आहोत.
 दरम्यान, प्राचार्य संघटनेमध्ये सुद्धा याबाबत अस्वस्थता आहे.त्यामुळे एनईपीच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणीवर प्राचार्य संघटनेत चर्चा केली जाणार आहे.तसेच विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेऊन या संदर्भातील भूमिका येत्या सोमवारी किंवा मंगळवारी स्पष्ट केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
------------------------------
 
"नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्राध्यापकांची मानसिकता तयार झाली पाहिजे. मात्र, विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, प्राचार्य, संस्थांचालक व शिक्षकेतर कर्मचारी या कोणालाही एनईपी याबाबत मार्गदर्शन केलेले नाही.त्यामुळे चालू वर्षांपासून एनईपीची अंमलबजावणी होईल किंवा नाही याबाबत शंका आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विविध परिपत्रक काढले जात असले तरी प्रथम वर्षात प्रवेश घेणा-या विद्यार्थ्याला कोणता अभ्यासक्रम शिकायचा आहे, याबाबत त्याला कोणतीही कल्पाना देता येणार नाही.कारण अद्याप अभ्यासक्रमाचा तयार झालेले नाहीत.विद्यापीठातील अभ्यास मंडळ सदस्यांच्या नियुक्तीत झालेल्या गोंधळामुळे अभ्यासक्रम तयार करण्यास विलंब होणार आहे.तसेच अद्याप महाविद्यालयांना  प्रवेशाचे प्रॉस्पेक्ट तयार करता आले नाहीत.केवळ पुणे विद्यापीठाचेच नाही तर राज्यातील बहुतेक विद्यापीठांचे अभ्यासक्रम अद्याप तयार झाले नाहीत.त्यामुळे पुढील आठवड्यात होणा-या प्राध्यापक संघटनेच्या बैठकीत याबाबत चर्चा करून यावरील भूमिका स्पष्ट केली जाईल."

-  - डॉ.कान्हू गिरमकर , अध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्राध्यापक संघटना