ZP Recruitment : आत्महत्या कशाला करायची, जीव वर आलाय का? मंत्रालयातील ऑडिओ क्लिप व्हायरल

परीक्षेची वाट पाहणाऱ्या उमेदवारांनी ग्रामविकास विभागाला फोन केला तर तिथले अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात फोन करायला सांगतात.

ZP Recruitment : आत्महत्या कशाला करायची, जीव वर आलाय का? मंत्रालयातील ऑडिओ क्लिप व्हायरल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शासनाचा (Government) ढिसाळ आणि वेळ खाऊ कारभार काही नवीन नाही. पण जिल्हा परिषदेतील विविध पदांच्या भरतीची (Recruitment) तब्बल चार वर्षांपूर्वी जाहिरात येऊनही अजून एकही परीक्षा (Examination) झालेली नाही. त्यामुळे भरतीसाठी इच्छुक असलेले अनेक उमेदवार निराशेच्या गर्तेत जाऊ लागले असून एकाने नुकताच आत्महत्येचाही प्रयत्न केला. यापार्श्वभूमीवर एका विद्यार्थ्यांने ग्रामविकास मंत्रालयात दुरध्वनीवरून संपर्क साधला असता तेथील महिला अधिकाऱ्यांने दिलेले उत्तर धक्कादायक होते. 'आत्महत्या कशाला करायची, जीव वर आलाय का? कामं करा,' अशा शब्दांत संबंधित अधिकाऱ्याने उत्तर दिले. त्यावरून संताप व्यक्त होत आहे. (ZP recruitment stalled for four years)

परीक्षेची वाट पाहणाऱ्या उमेदवारांनी ग्रामविकास विभागाला फोन केला तर तर तेथील अधिकारी हे जिल्हाधिकारी कार्यालयात फोन करायला सांगतात. जिल्हाधिकारी कार्यालयात फोन केला तर तिथून ग्रामविकास विभागाला फोन करायला सांगतात. मधल्या मध्ये विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या उमेदवारांनी नुकतेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या सचिवांच्या कार्यालयात एका उमेदवारांने दुरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांना मिळालेले उत्तर धक्कादायक होते. या संभाषणाचा ऑडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ऑडिओतील महिलेचा आवाज हा ग्रामविकास मंत्रालयातील महिला अधिकाऱ्याचा असल्याचा दावा सोशल मीडियात केला जात आहे.

हेही वाचा : रात्रभर जागूनही टार्गेट पूर्ण नाहीच; ‘आधार’साठी माजी आमदार सरसावले

कार्यालयातील महिलेने या उमेदवारांना ग्रामविकास मंत्र्यांना घेराव घाला असा सल्ला दिल्याचे एका ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळते. तर दुसऱ्या क्लिपमध्ये आत्महत्येवरील संवाद आहे. लातूरमधील एका इच्छुक उमेदवाराने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती एक विद्यार्थी संबंधित महिलेला देत आहे. त्यावर 'आत्महत्या कशाला करायची, जीव वर आलाय का, कामे करा'असे ती महिला म्हटली. तब्बल चार वर्ष वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही हातघाईला आलेला आहात, अशी घाई करून कसे चालेल. कितीतरी परीक्षा होत असतात त्या सर्वांचे काम आम्हाला पाहावे लागते. आम्ही या परीक्षेसाठी काम पाहत नाही, असे प्रतिउत्तर दिले. ही महिला आणि विद्यार्थी यांच्यात झालेल्या संवादाचा कथित ऑडिओ 'एज्युवार्ता' च्या हाती लागला आहे. 

हेही वाचा : शिक्षण विभागाचा शाळांना दणका; वेतन रोखले, तुघलकी निर्णय असल्याची टीका

दरम्यान, २०१९ मध्ये जिल्हा परिषदेकडून कनिष्ठ अभियंता, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका अशा विविध १७ पदांच्या परीक्षेसाठी जाहिरात काढण्यात आली होती. त्यावेळी या पदांच्या राज्यभरात १३ हजार ५२१ जागा रिक्त होत्या. या जागांसाठी राज्यभरातून १२ लाख ७२ हजार ३१९ उमेदवारांनी अर्ज केले होते. या पदांसाठी जाहिरात निघाली, उमेदवारांनी अर्ज केले, त्यासाठीचे शुल्कसुद्धा भरले. पण परीक्षाच झाली नाही. मागील चार वर्षात चार वेळा पदभरतीच्या जाहिराती निघाल्या. पण परीक्षा मात्र झालेल्या नाहीत.

''२०१९ पासून जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी शासनाकडून केवळ चालढकल केली जात आहे. विद्यार्थी गेल्या चार वर्षांपासून परीक्षेची वाट पाहत आहेत. परीक्षेला विलंब होत असल्याने एका विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार लातूर येथे घडला. परीक्षार्थी उमेदवार मंत्रालयातील अधिकाऱ्यांना परीक्षेविषयी माहिती विचारतात, त्यावेळी त्यांना ठोस उत्तर मिळत नाही. त्यासंदर्भातील काही ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाल्या आहेत.'' 

- रोहित खुडे, बेरोजगार तरूण