SPPU : फोटोकॉपी आणि गुण पडताळणीवरून अभविपचे विद्यापीठात आंदोलन

पुढच्या सत्र परीक्षा अर्ज भरण्याची मुदत संपली असून मागच्या सत्र परीक्षांचे पुनर्मूल्यांकन निकाल लावण्यात आले नाहीत.

SPPU : फोटोकॉपी आणि गुण पडताळणीवरून अभविपचे विद्यापीठात आंदोलन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी मागीलच्या सत्राचे निकाल लागल्यानंतर उत्तरपत्रिकांच्या छायांकीत प्रतीसाठी (Photocopies of answer sheets) अर्ज केले होते. परंतु दोन ते अडीच महिने उलटून गेल्यानंतर सुद्धा अद्यापही विद्यार्थ्यांना छायांकीत प्रती प्राप्त झालेल्या नाहीत. अभविपने परीक्षा विभागाशी संपर्क केला, चर्चा केली निवेदने दिली. परंतु, हा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) वतीने परीक्षा विभागाच्या विरोधात आंदोलन (Agitation against examination department) करण्यात आले. 

काही विद्यार्थ्यांना छायांकित प्रती मिळाल्या. परंतु, त्यांचे पुनर्मूल्यांकन झालेले नाही. पुढच्या सत्र परीक्षाचे अर्ज भरण्याची मुदत संपली असून मागच्या सत्र परीक्षांचे पुनर्मूल्यांकन निकाल लावण्यात आले नाहीत. हा विद्यार्थ्यांवर नाहक अन्याय आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी छायांकित प्रतींसाठी अर्ज केलेला आहे. त्यांना तात्काळ छायांकित प्रती देण्यात याव्या व पुनर्मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. तसेच ज्या विद्यार्थ्यांचा पुनर्मूल्यांकन निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही तो तात्काळ जाहीर करावा.त्याचप्रमाणे पुनर्मूल्यांकन निकालात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झालेल्या विषयांचे शुल्क परत देण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी अभाविपने विद्यापीठात आंदोलन केले. 

अभाविचे महाराष्ट्र प्रांत मंत्री अनिल ठोंबरे म्हणाले, 'ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट' मानले जाणारे हे पुणे विद्यापीठ विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत लावून सुद्धा गुण पडताळणी आणि फोटोकॉपीला धरून विद्यार्थ्यांना खेळवत असेल तर ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने काम न केल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालेच आहे. विद्यार्थ्यांचा त्रास न थांबल्यास अभाविप परीक्षा विभागाच्या विरोधामध्ये मोठ आंदोलन उभे करेल.