उन्हाळी सुट्टीत काय करायचं? हा लेख वाचा अन् करिअरला द्या दिशा   

अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करण्याचे धडे काही मुले उन्हाळी सुट्टीत सुद्धा गिरवू लागतात. अशा मुलांसाठी आता विविध संस्था उन्हाळी शिबिरे भरवतात.

उन्हाळी सुट्टीत काय करायचं? हा लेख वाचा अन् करिअरला द्या दिशा   
Acting Workshop

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

ग्रीस देशातील ईकरिआ येथील थेस्पीस (Thespis) याला रंगमंचावरील पहिला अभिनेता म्हणून ओळखले जाते. थेस्पीस काव्यत्मक निवेदनातून बाहेर यायचा व वेगळ्याच पात्राच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधायचा. अशा छोट्या स्वरूपात सुरु झालेले अभिनयाचे (Acting) क्षेत्र आता सगळीकडे व्यापले आहे. फक्त मोठ्यांसाठीच नव्हे तर अगदी लहान मुलांनासुद्धा यात करिअर (Career) घडवता येते ते सुद्धा शाळा, अभ्यास सांभाळून. (Acting Workshop)

अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करण्याचे धडे काही मुले उन्हाळी सुट्टीत सुद्धा गिरवू लागतात. अशा मुलांसाठी आता विविध संस्था उन्हाळी शिबिरे भरवतात. अभिनयासाठी अनेक प्रकारच्या कौशाल्यांची गरज असते. जसे की, आवाजाची फेक, स्पष्ट उच्चार, देहबोली, भावनिक आरेखन, उत्कृष्ठ कल्पनाशक्ती, आणि नाट्य (नाट्य स्वरूपात कल्पना) सादर करण्याची क्षमता. अभिनय क्षेत्रात याशिवायही भाषेवरील प्रभुत्व, उच्चार आणि देहबोली, सादरीकरण (सादरीकरणाची क्षमता), निरिक्षण आणि नकला करण्याची क्षमता, मुकाभिनय, आणि अभिनयाची  भूक  इत्यादी गोष्टींची आवशक्यता असते. ही कौशल्य आत्मसात करता येतात. 

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. https://eduvarta.com/

अनेक अभिनेते, या प्रकारची कौशल्ये विकसीत करणाऱ्या  खास कार्यशाळेतून किंवा महाविद्यालयातून तयार झालेले असतात. पूर्वी या क्षेत्राकडे लोकांचा पाहण्याचा  दृष्टिकोन काहीसा नकारात्मक होता. पण मागील २० वर्षात हे चित्र बदलत आहे. या अभिनय क्षेत्राला आता एक वलय निर्माण झाले आहे. या क्षेत्रातही चांगले करिअर घडू शकते, या क्षेत्रातूनही चांगला पैसा मिळू शकतो यावर लोकांचा विश्वास वाढत आहे. आपल्या मुलांना आवड असली किंवा त्यांचा त्याकडे कल आहे, ते पालकांना वाटले तर ते आवर्जून आपल्या पाल्याना अभिनयाच्या कार्यशाळेत पाठवतात.

या कार्यशाळा आता उन्हळ्यातील विरंगुळा इतपत मर्यादित राहिलेल्या नाहीत. तर या कार्यशाळेतून अनेक चांगले कलाकार, बालकलाकार, कलाक्षेत्राला मिळाले आहेत. सध्या या उन्हाळी कार्यशाळांचे व्याप्ती खूप वाढली आहे. त्यातही अभिनय, ललित कला या विषयांवरील कार्यशाळेवर पालक आणि विद्यार्थ्यांचा विशेष भर असतो. कारण कार्यशाळेत मिळणारे धडे वयक्तिक आयुष्य, व्यक्तिमत्व विकास घडवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात.

अभिनयाच्या कार्यशाळेत घेतल्या जाणाऱ्या रंगमंचीय खेळ (थिएटर गेम्स ) च्या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकास होतो, त्यांची एकाग्रता वाढते, दैनंदिन आयुष्यात कसे वागावे, कसे बोलले पाहिजे याची जाणीव मुलांना होते, मुलांमध्ये सामाजिक भान निर्माण होतो. त्यामुळे फक्त अभिनय क्षेत्रच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रात जाणाऱ्या मुलांना ही कार्यशाळा उपयुक्त ठरते. मागील काही वर्षांपासून लहान मुलांसाठी सुद्धा अभिनयाच्या क्षेत्रात बऱ्याच संधी उपलब्ध होत आहेत. चित्रपट, मालिका, नाटक, जाहिराती, मॉडेलिंग, रिल्स अशी बरीच दालने लहान मुलांसाठी खुली झाली आहेत.

याविषयी 'एज्यु - वार्ता ' शी बोलताना अभिनयाची कार्यशाळा घेणारे देवदत्त पाठक म्हणाले, "अभिनय उपजत असावा असा काहींचा समज असतो, पण हा शुद्ध गैरसमज आहे. कारण अभिनय शिकताही येतो आणि शिकवताही येतो. पण फक्त ८-१० दिवसांची कार्यशाळा किंवा शिबिरे या कौशल्यासाठी पुरेशी नसतात. त्याचा सराव  आवश्यक आहे. या कार्यशाळांमधून घेणाऱ्या रंगमंचीय खेळांमधून फक्त कलाकार घडत नाहीत तर  मुलांचा सर्वांगीण विकास होतो. मुलांना जर योग्य वयात  योग्य मार्गदर्शन मिळाले तर या माध्यमातून सजग नागरिक घडू शकतात. या कार्यशाळा मुलांसाठी दिशादर्शक ठरू शकतात."