टीईटी घोटाळ्यात तुकाराम सुपेसह आणखी दोघांवर गुन्हे दाखल

सोलापूरचे शिक्षणाधिकारी किरण लोहार आणि सांगलीचे निवृत्त शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांच्या विरोधात एसीबीने गुन्हे दाखल केल्याने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.

टीईटी घोटाळ्यात तुकाराम सुपेसह आणखी दोघांवर गुन्हे दाखल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षण क्षेत्राला हादरून टाकणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्यात (TET Scam )आणखी मोठी घडामोड घडली आहे. राज्य परीक्षा परिषदेचे माजी आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram supe)यांच्यासह आणखी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) ही कारवाई करण्यात आली आहे. सोलापूरचे शिक्षणाधिकारी किरण लोहार (Solapur Education Officer Kiran Lohar)आणि सांगलीचे निवृत्त शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे (Vishnu Kamble, Retired Education Officer of Sangli )यांच्या विरोधात एसीबीने गुन्हे दाखल केल्याने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.

वैध उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी तुकाराम सुपे (वय ५९ रा.पिंपळे गुरव) यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.आता त्यांच्याविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुपे यांनी नियुक्तीपासून सेवानिवृत्त कालावधीपर्यंत केलेल्या गैरव्यवाचे परीक्षण करून एसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा : कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांना कारणे दाखवा नोटीस

टीईटी घोटाळा 2021 मध्ये समोर आला होता.त्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती.त्यात अनेक आजी-माजी शिक्षणाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. सायबर पोलिसांनी सुपे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी तब्बल २ कोटी ६७  लाख ९९  हजार ५९०  रुपये आणि ७२  लाख रुपये किमतीचे १४५  तोळे सोने अशी एकूण ३ कोटी ६९  लाख ९९  हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. सुपे यांनी मिळवलेली कोट्यवधी रुपयांची संपत्ती ही भ्रष्ट मार्गाने मिळवली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

सुपे यांच्याबरोबरच सोलापूरचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी यांच्या विरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून  पाच कोटी ८५ लाख रुपयांची संपत्ती भ्रष्ट मार्गाने जमवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.याप्रकरणी लोहार यांची पत्नी सुजाता आणि मुलगा निखिल यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. लोहार कुटुंबीयांनी जमवलेली मालमत्ता ही बेकायदा स्वरूपात जमा केली असल्याचे उघडकीस आले आहे.

पोलीस तपासात सांगलीचे निवृत्त शिक्षणाधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे आणि त्यांची पत्नी जयश्री कांबळे यांच्या विरोधात भ्रष्ट मार्गाने संपत्ती जमवल्याचा गुन्हा दाखल झाला असून कांबळे यांच्याकडे ८३ लाख रुपयांची संपत्ती सापडली आहे.