UPSC, MPSC चे टॉपरच तलाठी भरतीच्या गुणवत्ता यादीत ;  500 उमेदवारांची यादीच तयार

युपीएससी व एमपीईएससीच्या परीक्षांची काठिण्य पातळी विचारात घेता त्यांना तलाठी भरतीची परीक्षा अत्यंत सोपी गेली.

UPSC, MPSC चे टॉपरच तलाठी भरतीच्या गुणवत्ता यादीत ;  500 उमेदवारांची यादीच तयार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

तलाठी भरतीत (Talathi Recruitment) गोंधळ झाल्याचा आरोप सातत्याने होत असला तरी तलाठी भरतीच्या गुणवत्ता यादीतील उमेदवार यापूर्वीच्या यूपीएससी व एमपीएससीच्या  विविध परीक्षेतील टॉपर (Toppers of UPSC, MPSC) असल्याची माहिती समोर आली आहे. काही उमेदवारांनी सर्व तपासणी करून सुमारे 500 उमेदवारांची यादीच तयार केली आहे. त्यामुळे गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांनी पैसे देऊन गुण मिळवले असल्याचा आरोप चुकीचा आहे, असे तलाठी भरतीची परीक्षा दिलेल्या गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांनी सांगितले.

तलाठी भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान गैरप्रकार  झाल्याचे आढळून आले आहे. काही उमेदवारांना दोनशे पैकी 200 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले. मात्र नॉर्मलायझेशन पद्धतीचा अवलंब केल्यामुळे हे झाले आहे. त्यात आश्चर्यचकित होण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही परीक्षेत काही अनुचित प्रकार घडला म्हणून संबंधित परीक्षा रद्द केली जात नाही. त्यामुळे तलाठी भरतीसाठी घेण्यात आलेली परीक्षा रद्द न करता या परीक्षेचा निकाल तात्काळ जाहीर करून पात्र उमेदवारांना नियुक्ती द्यावी, अशी मागणी टॉपर उमेदवारांकडून केली जात आहे.

हेही वाचा : शिक्षक भरतीचा उद्देश युवकांना नोकरी देणे नाही तर शिक्षण व्यवस्था बळकट करणे : सूरज मांढरे

युपीएससी व एमपीएससीच्या विविध परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवले.मात्र, एक किंवा दोन गुणांनी नोकरीची संधी हुकली,आशा उमेदवारांनी तलाठी भरतीची परीक्षा दिली.त्यामुळे या विद्यार्थ्यांना या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळाले आहेत. युपीएससी व एमपीएससीच्या परीक्षांची काठिण्य पातळी विचारात घेता त्यांना ही परीक्षा अत्यंत सोपी गेली.त्यामुळे गैरप्रकार करून किंवा पैसे देवून आम्ही हे गुण मिळवले नाहीत तर अभ्यासाच्या जोरावर मिळाले आहेत,असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

सातारा जिल्ह्यातील किरण कुंदळकर या उमेदवाराने तलाठी भरतीत  201 गुण मिळाले असून त्याने यापूर्वी एमपीएससीच्या एएसओ आणि  एसटीआय परीक्षेत चांगले गुण मिळवलेले होते . तसेच छत्रपती संभाजीनगर येथील सुनील निर्मल याने तलाठी भरतीत २०३  गुण मिळवले असून 2023 ची पीएसआय  न्स परीक्षा दिली आहे. पुण्यातील आदित्य शेटे यांनी तलाठी भरती परीक्षेत 204 गुण मिळवले असून त्याने यापूर्वी एमपीएससी लीगल मेट्रोलॉजी आणि एमपीएससी मुख्य परीक्षेत चांगले गुण मिळवले होते, अशा प्रत्येक जिल्ह्यातील टॉपर उमेदवाराची माहिती तयार करण्यात आली असून संबंधित माहिती तपासून घेण्यात आली आहे.त्यामुळे तलाठी भरती प्रकरणात दोषी असणाऱ्यांना सर्व परीक्षांसाठी बंदी घालावी, परीक्षेत गैरवहार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. मात्र, ज्यांनी अभ्यास करून परीक्षेत टॉप केले आहे,  त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी,अशी मागणी धनंजय शिंदे, निकिता गव्हाणे, आदित्य सुडे  आदी विद्यार्थ्यांनी केली आहे.