टी.जे. कॉलेज आता हायटेक कॉलेज झाले - कृष्णकुमार गोयल

शैक्षणिक क्षेत्रात होत असलेले बदल महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी देखील स्वीकारायला हवेत

टी.जे. कॉलेज आता हायटेक कॉलेज झाले  - कृष्णकुमार गोयल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

खडकी शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नेहमीच दक्ष असते. विद्यार्थी केंद्रित शिक्षण हा खडकी शिक्षण संस्थेचा मूळ गाभा आहे. त्यामुळेच शैक्षणिक क्षेत्रात होत असलेले बदल महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी देखील स्वीकारायला हवेत, यासाठीच संस्था आता हायटेक होत आहे, असे संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी सांगितले. 

खडकी शिक्षण संस्थेच्या टी जे महाविद्यालयात इंटरॲंक्टिव्ह बोर्डच्या उद्घाटन प्रसंगी गोयल बोलत होते. यावेळी संस्थेच्या सचिवांसह प्राचार्य डॉ संजय चाकणे, उपप्राचार्य अर्जुन मुसमाडे, संस्थेचे संचालक ज्ञानेश्वर मुरकुटे, रमेश अवस्थे,  प्राचार्य संजय चाकणे , उपप्राचार्य राजेंद्र लेले, प्रा.स्वामीराज भिसे. आणि शिक्षक विद्यार्थी आदी होते

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिक्षण देण्याच्या पद्धतीनुसार महाविद्यालयामध्ये आता मोठ्या प्रमाणात परिवर्तन होताना दिसत आहेत. पुण्यातील विविध महाविद्यालय नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रभावीपणे महाविद्यालयांमध्ये राबविण्यासाठी आधुनिक यंत्रणांचा वापर करताना दिसत आहेत. याचाच विचार करून खडकी शिक्षण संस्थेचे टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांनी सुद्धा महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडवून आणले आहे.

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाने इ-स्टुडिओ ची निर्मिती करून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. यामध्ये आत्तापावेतो १७५ पेक्षा जास्त इ कंटेंट निर्मिती झाली आहे. त्याचबरोबर काही दिवसांमध्ये महाविद्यालयाचे स्वतंत्र रेडिओ स्टेशन ८६.९ एफएम सुरू होत  आहे. यासह महाविद्यालय आता खडू आणि फळा यांचा वापर न करता आधुनिक इंटरॲंक्टिव्ह बोर्डचा वापर करून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी गोडी निर्माण करीत आहे. खडकीतील विद्यार्थी डिजिटली स्मार्ट असून इंटरैक्टिव बोर्डचा उत्तम वापर करुन अध्यापनासाठी योग्य वापर करतील ,असा विश्वास प्राचार्य डॉ संजय चाकणे यांनी व्यक्त करत उपस्थितांचे आभार व्यक्त केले.