NEET 2024 UG परीक्षेत टाय ब्रेकिंगचे नियम पुन्हा बदलले 

जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रातील गुण समान राहिले तर विद्यार्थ्यांची NEET रँक संगणकावरील लकी ड्रॉद्वारे निश्चित केली जाणार होती. या निर्णयानंतर विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

NEET 2024 UG परीक्षेत टाय ब्रेकिंगचे नियम पुन्हा बदलले 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) अंडरग्रेजुएट परीक्षेला आता दोन महिन्यांपेक्षा ही कमी वेळ शिल्लक असताना आता नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने NEET UG परीक्षा 2024 मध्ये मोठा बदल केला आहे. यासंदर्भात सुधारित NEET 2024 माहिती बुलेटिन देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे. अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in  वर प्रसिद्ध झालेल्या या माहितीच्या बुलेटिननुसार  2024 UG NEET परीक्षेत टाय ब्रेकिंगचा नियम पुन्हा एकदा बदलण्यात आला आहे. 

NTA ने यावर्षी NEET 2024 UG परीक्षेत टाय ब्रेकिंगसाठी नवीन नियम समाविष्ट केला होता. जर जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रातील गुण समान राहिले तर विद्यार्थ्यांची NEET रँक संगणकावरील लकी ड्रॉद्वारे निश्चित केली जाणार होती. या निर्णयानंतर विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. एजन्सी लकी ड्रॉद्वारे मुलांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे परिणाम कसे ठरवू शकते? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यानंतर आता NTA ने पुन्हा टाय ब्रेकिंग चा निर्णय बदलला आहे. 

असा असले नवीन नियम 

सर्वप्रथम या विद्यार्थ्यांपैकी कोणाला जीवशास्त्र (वनस्पतिशास्त्र आणि प्राणीशास्त्र) या विषयात जास्त गुण किंवा टक्केवारी मिळाली आहे, हे पाहिले जाईल. जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवाराला उच्च श्रेणी दिली जाईल. जर जीवशास्त्रातही गुण समान असतील तर रसायनशास्त्र विषयाच्या गुणांचा विचार केला जाईल.  ज्या विद्यार्थ्याने रसायनशास्त्रात जास्त गुण मिळवले आहेत, त्याला अधिक चांगली रँक दिली जाईल. रसायनशास्त्रातील गुण समान असल्यास, भौतिकशास्त्रातील गुणांचा आधार घेतला जाईल. भौतिकशास्त्रात जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवाराला उच्च श्रेणी दिली जाईल. वरील तीन विषयांमध्ये गुण समान असल्यास, परीक्षेत दिलेल्या एकूण प्रश्नांमध्ये चुकीच्या आणि बरोबर उत्तरांचे गुणोत्तर पाहिले जाईल. एकूण प्रश्नांमध्ये चुकीच्या उत्तरांचे प्रमाण कमी असलेल्या विद्यार्थ्याला NEET मध्ये चांगली रँक दिली जाईल. जर चुकीच्या आणि बरोबर उत्तरांचे एकंदर गुणोत्तर देखील समान असेल, तर केवळ जीवशास्त्र (वनस्पतिशास्त्र आणि प्राणीशास्त्र) प्रश्नांमध्ये दिलेल्या चुकीच्या आणि बरोबर उत्तरांचे गुणोत्तर पाहिले जाईल. ज्याचे गुणोत्तर कमी असेल त्याला उच्च NEET श्रेणी दिली जाईल. जर जीवशास्त्रातही गुणोत्तर समान असेल, तर रसायनशास्त्रातील प्रश्नांमध्ये दिलेल्या चुकीच्या आणि बरोबर उत्तरांचे गुणोत्तर पाहिले जाईल. कमी गुणोत्तर असलेला उमेदवार पुढे केला जाईल. शेवटी, रसायनशास्त्रात गुणोत्तर समान असल्यास, भौतिकशास्त्राच्या पेपरमध्ये दिलेल्या चुकीच्या आणि बरोबर उत्तरांचे गुणोत्तर लागू केले जाईल. कमी गुणोत्तर असलेले उमेदवार NEET रँकिंगमध्ये पुढे असतील.