रिपोर्ट कार्ड कलबाह्य ठरणार.. शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांना मिळणार 'होलिस्टिक रिपोर्ट कार्ड' 

आता केवळ परीक्षेत मिळालेल्या ग्रेड आणि गुणांच्या आधारे रिपोर्ट कार्ड बनवले जाणार नसून, मुलांचे शिक्षक, त्यांच्यासोबत शिकणारे विद्यार्थी आणि पालकांच्या प्रतिक्रियाही रिपोर्ट कार्डमध्ये समाविष्ट केल्या जाणार आहेत.

रिपोर्ट कार्ड कलबाह्य ठरणार..  शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांना मिळणार 'होलिस्टिक रिपोर्ट कार्ड' 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शाळेत परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रगती पुस्तक अर्थात रिपोर्ट कार्ड (Report card) आता कलबाह्य ठरण्याची शक्यता आहे. यापुढे केवळ परीक्षेत मिळालेल्या ग्रेड आणि गुणांच्या  (Grades and marks)आधारे रिपोर्ट कार्ड बनवले जाणार नसून, मुलांचे शिक्षक, त्यांच्यासोबत शिकणारे विद्यार्थी आणि पालकांच्या प्रतिक्रियाही रिपोर्ट कार्डमध्ये समाविष्ट केल्या जाणार आहेत. याला HPC म्हणजेच होलिस्टिक रिपोर्ट कार्ड (Holistic Report Card) असे नाव देण्यात आले आहे. 

परफॉर्मन्स असेसमेंट, रिव्यू अँड अनालिसीस ऑफ नॉलेज फॉर  होलिस्टिक डेव्हलोपमेंट (PARAKH) च्या  सीईओ इंद्राणी भादुरी यांनी याविषयी माहिती दिली. इंद्राणी भादुरी म्हणाल्या की, " पारख, नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT)  या नवीन प्रकारच्या रिपोर्ट कार्डच्या धर्तीवर काम करत आहे. इयत्ता पहिली ते आठवीसाठी रिपोर्ट कार्डचा नवा पॅटर्न तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर 9 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन रिपोर्ट कार्ड बनवण्यात येत आहेत." 

नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर स्कूल एज्युकेशन (NCFSE) च्या सल्ल्यानुसार नवीन होलिस्टिक रिपोर्ट कार्डची रचना केली जात आहे.  हे कार्ड निकाल केंद्रित न करता विद्यार्थी केंद्रित करण्यावर भर दिला जात आहे. याचा अर्थ रिपोर्ट कार्डचा फोकस आता निकालापेक्षा शिकण्यावर असेल. हे केवळ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड राखण्यात मदत करेल,असे नाही तर विद्यार्थी स्वतः रिपोर्ट कार्ड बनवण्याच्या प्रक्रियेचा भाग असतील.

यामध्ये विद्यार्थ्यांची एखाद्या प्रकल्पावर आधारित कौशल्य चाचणी घेतली जाईल. या सर्व कौशल्यांची ॲक्टिव्हिटी बेस्ड टेस्ट घेतली जाईल आणि प्रत्येक विद्यार्थ्याला ॲक्टिव्हिटीनंतर गुण दिले जातील.