COEP : मेट्रो स्थानक ऑडिट प्रकरणाची सखोल चौकशी होणार

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या वतीने डॉ. ईश्वर सोनार यानी त्रयस्थ परिक्षणाचे काम स्वीकारून त्यांनी आपला प्राथमिक अहवाल पुणे महामेट्रोच्या प्रशासनाला सादर केल्याचे निदर्शनास आलेले आहे.

COEP : मेट्रो स्थानक ऑडिट प्रकरणाची सखोल चौकशी होणार
College of Engineering Pune

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुणे मेट्रोच्या (Pune Metro) स्थानकांच्या ऑडिटमध्ये अनेक त्रुटी आढळल्यानंतर सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाकडे (COEP Technical University) बोट दाखविले जात होते. पण प्रत्यक्षात डॉ. ईश्वर सोनार (Ishwar Sonar) यांनी विद्यापीठाच्या वतीने त्रयस्थ परिक्षणाचे काम स्वीकारून आपला प्राथमिक अहवाल दिल्याचे निदर्शनास आले आहे. हे प्रकरण विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने घेतले असून त्याची सखोल चौकशी केली जाणार आहे. (COEP News)

कुलसचिव डॉ. डी. एन. सोनवणे यांनी याबाबत विद्यापीठाची भूमिका स्पष्ट केली आहे. पुणे मेट्रो हा शहराच्या विकासाला गती प्राप्त करून देणारा एक अत्यंत महत्वाचा प्रकल्प असून सर्वसामान्य जनतेच्या वाहतुकीच्या महत्त्वाच्या व ज्वलंत प्रश्नावर परिपूर्ण पर्याय ठरणार आहे. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या वतीने डॉ. ईश्वर सोनार यानी त्रयस्थ परिक्षणाचे काम स्वीकारून त्यांनी आपला प्राथमिक अहवाल पुणे महामेट्रोच्या प्रशासनाला सादर केल्याचे निदर्शनास आलेले आहे. या प्राथमिक अहवालातील काही तांत्रिक बाबीसंबंधी विविध माध्यमातून निरीक्षणे नोंदविण्यात आलेली आहेत, असे कुलसचिवांनी सांगितले.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

सदर बाबीची विद्यापीठ प्रशासनाने दखल तातडीने घेतली असून ह्या विषयातील अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या समितीद्वारे हे परीक्षण पुन्हा करून, पुणे मेट्रो च्या प्रशासनाकडे अंतिम विस्तृत अहवाल लवकरात लवकर सादर करण्यात येईल. त्याच बरोबर हे काम स्वीकारण्यापासून प्राथमिक अहवाल सादर करणेपर्यंतच्या प्रक्रियेमधील त्रुटींचा शोध घेण्यासाठी विद्यापीठाने त्वरित पावले उचलली आहेत, असेही डॉ. सोनवणे यांनी स्पष्ट केले आहे.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ हे स्वतःची प्रतिष्ठा व समाजमान्यता जपत, अशा घटनांची भविष्यात पुनरावृत्ती होवू नये यासाठी कटिबध्द असून, समाजास उपयुक्त सेवा देण्यास बांधील आहे. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेकविध प्रकल्प बारकाईने अभ्यासून त्यांच्यातील गुणात्मक वाढीसाठी येथील अध्यापक वर्गाचा अनुभव आणि त्याच्या विषयातील नैपुण्य याचा समाजाच्या भल्यासाठी उपयोग करून देणे ही संस्थेची नेहमीच प्राथमिकता राहिली आहे. त्याद्वारे विविध औद्योगिक यंत्रणा, संरक्षण क्षेत्र, शासकीय व अशासकीय प्रकल्प यांच्यासाठी भरीव योगदान देता आले आहे, असे खुलाशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : सीओईपीने केलेले मेट्रो स्थानकांचे 'स्ट्रक्चरल ऑडिटिंग' वादात

काय आहे प्रकरण?

महामेर्टोकडून मेट्रो स्थानकांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. पण गरवारे महाविद्यालय, नळस्टॉप, आनंदनगर आणि वनाज या स्थानकांच्या कामात त्रुटी आढळून आल्या आहेत. याप्रकरणी काही जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. स्ट्रक्चरल इंजिनिअर नारायण कोचक, इंजिनिअर शिरीष खासबारदार, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार सिव्हिल, कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. केतन गोखले, हैदराबाद मेट्रो रेलचे माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक गाडगीळ यांनी प्रत्यक्ष पाहणी करून त्रुटी निदर्शनास आणून दिल्या आहेत.

महामेट्रोनेही या त्रुटी मान्य केल्या आहेत. पण स्थानके सुरक्षित असल्याचा दावाही करण्यात केला जात आहे. त्यानंतर या त्रुटी महामेट्रोकडून दुरूस्तही करण्यात आल्या. काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रोने ऑडिटचे काम सीआईपीला दिले. त्यासाठीही पैसेही दिले. महाविद्यालयाकडून ऑडिटचा अहवालही दिला. याच अहवालावरून वाद निर्माण झाला आहे. सीओईपीतील सहयोगी प्राध्यापक डॉ. ईश्वर सोनार यांनी हा अहवाल दिला आहे. स्थानके सुरक्षित असल्याचा दावा याच अहवालाच्या आधारे केला जात आहे. सध्या सोनार हे महाविद्यालयात कार्यरत नाहीत. त्यांना २०१९ मध्येच सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. त्यामुळे महाविद्यालयाने त्यांच्याकडून ऑडिटचे काम कसे करून घेतला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.