इकडे औषधांची कमी अन् तिकडे लाखोंच्या औषधांचे पाणी ; वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार 

धाराशिव जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे तेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाणी शिरले. त्यामुळे तळघरात ठेवलेली लाखोंची औषधे पाण्यात भिजली.

इकडे औषधांची कमी अन् तिकडे लाखोंच्या औषधांचे पाणी ;  वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

धाराशिव जिल्ह्यात (Dharashiv District News) मागील चार दिवसांपासून सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे (Heavy rain) तेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (Government Medical College and Hospital) पाणी शिरले. त्यामुळे तळघरात ठेवलेली लाखोंची औषधे पाण्यात भिजली. एकीकडे औषध उपलब्ध होत नसल्याच्या नागरींकडून तक्रारी केल्या जात असताना तिकडे मात्र लाखोंची औषध पाण्यात भिजली आहेत. 

घडलेला प्रकार महाविद्यालय प्रशासनाच्या लक्षात येताच तत्काळ हालचालींना वेग आला आणि औषधांचा साठा जुन्या इमारतीमधील औषध भांडारगृहात शिफ्ट करण्यात आला. लाखो रूपयांची औषध पाण्यात भिजली असली तरी बॉटल्स काचेच्या असल्याकारणामुळे खराब झाले नसल्याचे दावा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे. असे असले तरी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शेकडो बाटल्या पाण्यात भिजल्याचे दिसत आहे.

मागील दोन वर्षांपूर्वी धाराशिव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यान्वित करण्यात आले. जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत दोन वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालय सुरू आहे. रुग्णालय सुरू झाल्याने सोयीसुविधा वाढतील, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. असे असले तरी डॉक्टरांकडून उपचारामध्ये हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप जिल्ह्यातील नागरीकांकडून सातत्याने होत असतो. शिवाय, आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच औषधांची कमतरता भासत असल्याचा आरोप विरोधकांकडून सतत केला जातो. या प्रकरणामुळे आता विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. 

रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत औषध भंडार कक्ष असताना सव्वा तीन कोटींची औषधी नवीन इमारतीच्या तळघरात ठेवण्यात आले होते. यामध्ये सलाइन, औषधांच्या बाटल्या, टॅबलेटच्या पाकिटांचा समावेश होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शेकडो बाटल्या भिजल्याचे दिसत आहे. मात्र, कोणतेही औषध खराब झाले नसल्याचा दावा मेडिकल प्रशासनाने केला आहे.