परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय : पाचवी, आठवी शिष्यवृत्तीसह सर्व प्रमाणपत्र व गुणपत्रक डिजिटल स्वरूपात 

परीक्षांचा निकाल लागल्यानंतर पात्र उमेदवारांपर्यंत प्रमाणपत्र व गुणपत्रक पोहोचण्यास किमान एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. परंतु ,या पुढील काळात सर्व प्रमाणपत्र हे डिजिटल स्वाक्षरीने दिले जाणार आहेत.

परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय : पाचवी, आठवी शिष्यवृत्तीसह सर्व प्रमाणपत्र व गुणपत्रक डिजिटल स्वरूपात 


एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांचे प्रमाणपत्र व गुणपत्रक यापुढील काळात डिजिटल स्वरूपात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला  आहे. त्यामुळे परीक्षेचा निकाल लागल्यानंतर १५ दिवसाच्या आत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गुणपत्रक प्राप्त होणार आहेत. या निर्णयामुळे परीक्षा परिषदेला आर्थिक तोटा सहन करावा लागणार असला तरी विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे.

परीक्षा परिषदेच्या माध्यमातून पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षांसह टायपिंग व लघुलेखन परीक्षा, डीएड परीक्षा अशा विविध परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांचा निकाल लागल्यानंतर पात्र उमेदवारांपर्यंत प्रमाणपत्र व गुणपत्रक पोहोचण्यास किमान एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. परंतु,  या पुढील काळात सर्व प्रमाणपत्र हे डिजिटल स्वाक्षरीने दिले जाणार आहेत.ही सर्व सुरक्षित असणार आहेत. त्यामुळे आपोआपच गैरप्रकाराला आळा बसणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित प्रमाणपत्रे ही कायमस्वरूपी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे यापुढील काळात परीक्षा परिषदेला पत्र पाठवून त्याची पडताळणी करण्याची आवश्यकता राहणार नाही.

विद्यार्थ्याला किंवा संबंधित संस्थेला किंवा नोकरीवर नियुक्त करणाऱ्या अधिकाऱ्याला विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी सहज करता येईल. या निर्णयामुळे ऑफलाइन पद्धतीमधील प्रमाणपत्र छापाई,  वितरणासाठी येणारा वाहन खर्च , मनुष्यबळ व वेळ यामध्ये मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे.

परीक्षा परिषदेतर्फे फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा (जीसीसी) साठी टायपिंग व लघुलेखन विषयासाठी प्रविष्ट झालेल्या एकूण ६२ हजार ७०६ विद्यार्थ्यांचे डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र परीक्षा परिषदेच्या आयुक्तांकडून ऑनलाइन स्वरूपात संबंधित संस्थांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. या प्रमाणपत्राची सत्यता पडताळण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करावा किंवा प्रमाणपत्रावरील नमूद केलेल्या संकेतस्थळावरील लिंक वर क्लिक करावे, त्यानंतर परीक्षेच्या नावाची निवड करावी, परीक्षा वर्ष व बैठक क्रमांक नमूद करावा, सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांची माहिती स्क्रीनवर पाहता येते, असे परिषदेतर्फे कळवण्यात आले आहे. 
---------------------
परीक्षा परिषदेने टायपिंग व लघुलेखन विषयासाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र आज उपलब्ध करून दिले आहे. यापुढील काळात इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, एनएमएमएस परीक्षा , डीएड परीक्षा अशा सर्व परीक्षांचे गुणपत्रक व प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात देण्यात येणार आहेत .

- शैलजा दाराडे, आयुक्त , राज्य परीक्षा परिषद