तर भारत होईल जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था..

सनदी लेखापाल यांच्या मार्गदर्शनाने आपल्या देशाच्या शताब्दी महोत्सवी वर्षात २०४७ पर्यंत जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचे ध्येय गाठता येईल.

तर भारत होईल जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था..
पुणे : अर्थव्यवस्थेला गती देण्याचे व सक्षम करण्याचे दायित्व सनदी लेखापालवर आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाने आपल्या देशाच्या शताब्दी महोत्सवी वर्षात २०४७ पर्यंत जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचे ध्येय गाठता येईल," असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. 
दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) डायरेक्ट टॅक्स कमिटी (डीटीसी) व आयसीएआय पुणे शाखेच्या वतीने 'प्रत्यक्ष कर' विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत पाटील बोलत होते. जवळपास ४५० सीए सभासद या परिषदेत सहभागी झाले आहेत. या प्रसंगी 'डीटीसी'चे व्हाईस चेअरमन सीए पियुष छाजेड, केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रशेखर चितळे, पुरुषोत्तम खंडेलवाल, प्रीती सावळा, विभागीय समिती सदस्य  ऋता चितळे, यशवंत कासार, आयसीएआय पुणेचे चेअरमन राजेश अग्रवाल, व्हाईस चेअरमन अमृता कुलकर्णी, सचिव अजिंक्य रणदिवे, प्रणव आपटे, मौशमी शहा, सचिन मिणियार, काशिनाथ पठारे आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले,संशोधन, इनोव्हेशन वाढल्याने आपणही उत्पादक बनत आहोत. इंधनात इथेनॉलचा वापर होऊ लागल्याने क्रूड ऑईलची दोन लाख कोटींची आयात कमी झाली आहे. त्यामुळेच आपल्याला रशियामधील अस्थिरतेचा फटका बसला नाही. प्रत्येक आर्थिक व्यवहारात सीएची गरज लागते. आर्थिक शिस्त लावण्याचे काम तुम्ही करत आहात."
"राज्यातील अनेक शाळा व संस्थांच्या शैक्षणिक शुल्काचे ऑडिट होत नाही. त्यामुळे आर्थिक स्थिती समजत नाही. यापुढे सनदी लेखापालांचे पॅनल नेमून शैक्षणिक शुल्काचे ऑडिट केले जाणार आहे. त्यासाठी राज्यात ७०० ते ८०० सीएची मदत घेतली जाणार आहे," असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रशेखर चितळे म्हणाले,  देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सर्व सीए योगदान देत आहेत. करसंरचनेतील बदल, तरतुदी समजाव्यात, त्यात सुसूत्रता आणण्यासाठी सनदी लेखापालांनी काही बदल सुचवावेत, यासाठी प्रत्यक्ष कर विषयावरील ही परिषद महत्वाची आहे. 
चॅरिटेबल ट्रस्टसाठीचे ऑडिट, टॅक्सेशनमधील संधी, प्रॉपर्टी ऍक्ट व ब्लॅक मनी ऍक्ट, प्राप्तिकरातील विविध कंगोरे, रियल इस्टेट अँड टॅक्सेशन अशा विविध विषयांवर सीए जगदीश पंजाबी, सीए पुरुषोत्तम खंडेलवाल, कपिल गोयल, सीए सुहास बोरा, सीए किशोर फडके, सीए प्रदीप कापसी आदी तज्ज्ञांनी दोन दिवसांच्या परिषदेत मार्गदर्शन केले. राजेश अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. अमृता कुलकर्णी यांनी स्वागत तर प्रणव आपटे यांनी आभार मानले. सीए प्रणव मंत्री यांनी सूत्रसंचालन केले.