पर्यावरण संवर्धनासाठी आपण कटिबद्ध व्हावे - डॉ. पराग काळकर

विद्यार्थी , नागरिकांमध्ये प्लास्टिक वापराबद्दल जाणीव जागृती करून पर्यावरण संवर्धनासाठी आपण कटिबद्ध व्हायला पाहिजे

पर्यावरण संवर्धनासाठी आपण कटिबद्ध व्हावे - डॉ. पराग काळकर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचा (Annasaheb Magar College) प्लास्टिक संकलन व हस्तांतरण उपक्रम कौतुकास्पद आहे. विद्यार्थी , नागरिकांमध्ये प्लास्टिक वापराबद्दल जाणीव जागृती करून पर्यावरण संवर्धनासाठी आपण कटिबद्ध व्हायला पाहिजे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी व्यक्त केले.

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वर्धापनदिना निमित्त महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पराग काळकर उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य बागेश्री मंठाळकर, डॉ. धोंडीराम पवार, अधिसभा सदस्य प्रसेनजीत फडवणीस, अधिसभा सदस्य राहुल पाखरे, रा.से.यो. संचालक डॉ. सदानंद भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे आदी उपस्थित होते. तसेच उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, डॉ. सुनीता दानाई - तांभाळे, डॉ. राजेश रसाळ आदी उपस्थित होते.

महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील प्लास्टिकचे संकलन केलेले ४८ किलो प्लास्टिक सागर मित्र संस्थेकडे हस्तांतरित केले. सदर उपक्रमांतर्गत प्लास्टिक संकलन अभियानास उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. प्लास्टिक संकलन अभियानाविषयी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. नितीन घोरपडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जाणीव जागृती निर्माण करणे हा या अभियानाचा उद्देश असल्याची सांगितले.