शासनाने चूक सुधारली; कनिष्ठ अभियंता भरतीतील शैक्षणिक पात्रतेत बदल

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत कनिष्ठ अभियंता स्थापत्य या संवर्गातील ५३२ तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संवर्गातील तब्बल १ हजार ३७८ जागा भरल्या जाणार आहेत.

शासनाने चूक सुधारली; कनिष्ठ अभियंता भरतीतील शैक्षणिक पात्रतेत बदल
PWD Recruitment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत (PWD) १४ संवर्गातील एकूण २ हजारे १०९ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. त्याअंतर्गत कनिष्ठ अभियंता स्थापत्य (गट ब) या पदासाठी पदविका ही शैक्षणिक पात्रता देण्यात आली होती. त्यावरून पदवीधारकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. रोष वाढू लागल्यानंतर शैक्षणिक पात्रतेत (Educational Qualification) बदल करण्यात आला असून आता कनिष्ठ अभियंता स्थापत्य (गट ब) या पदाच्या भरतीसाठी पदविका प्रमाणेच पदवीही ग्राह्य धरली जाणार आहे. (PWD Recruitment)

 

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत कनिष्ठ अभियंता स्थापत्य या संवर्गातील ५३२ तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संवर्गातील तब्बल १ हजार ३७८ जागा भरल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, लघुलेखक, उद्यान पर्यवेक्षक, सहायक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, स्वच्छता निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळाय सहाय्यक, वाहनचालक, स्वच्छक आणि शिपाई ही पदेही भरली जाणार आहेत.

Mumbai University : अखेर सिनेट निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, थेट पुढच्या वर्षीचा मुहूर्त

 

इच्छूकांना दि. ६. नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. तर दि. ७ नोव्हेंबरपर्यंत शुल्क भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.  विभागाच्या नियमावलीनुसार, कनिष्ठ अभियंता (गट ब) पदासाठी पदविका धारक पात्र करण्यात आले होते. परंतु पदवीधर अपात्र ठरविण्यात आले होते. तसेच अभियांत्रिकी सहाय्यक (गट क) पदासाठी पदवीधर आणि त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले म्हणजे पदवीधारकही पात्र ठरविण्यात आले होते. त्यामुळे पदवीधारकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

 

वरिष्ठ पदासाठी केवळ पदविकाधारक म्हणजे कमी शिक्षण असलेल्या उमेदवारांना संधी दिली जात असल्याने पदवीधारकांवर अन्याय असल्याची नाराजी व्यक्त केली जात होती. तर पदविकाधारकांकडून या निर्णयाचे समर्थन केले जात होते. यावरून नाराजी वाढू लागल्याने राज्य सरकारने शैक्षणिक पात्रतेत बदल केला आहे.

 

कनिष्ठ अभियंता स्थापत्य (गट ब) या पदासाठी स्थापत्य अभियांत्रिकीतील किमान पदविका किंवा पदवी अथवा त्यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता धारण करती असलेली व्यक्ती पात्र असेल, असे पत्रक पदभरतीच्या राज्यस्तरीय समन्वय समितीचे अध्यक्ष  र. रा. हांडे यांनी काढले आहे. त्यामुळे पदवीधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

संकेतस्थळ : http://mahapwd.gov.in/ 

 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k