खूशखबर : पात्र उमेदवारांना महाराष्ट्र दिनी मिळणार नियुक्तीपत्र

मुंबई तसेच जिल्हा स्तरावर प्रत्येकी १० उमेदवारांना पालकमंत्र्यांच्या हस्ते तर, २ व ३ मे रोजी नियुक्ती प्राधिकारी यांच्या हस्ते उर्वरित उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहेत.

खूशखबर : पात्र उमेदवारांना महाराष्ट्र दिनी मिळणार नियुक्तीपत्र
File Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य शासनाच्या (Maharashtra Government) विविध परीक्षांत उत्तीर्ण झालेल्या तब्बल २ हजार २ उमेदवारांना महाराष्ट्र दिनाचे (Maharashtra Day) औचित्य साधून नियुक्ती पत्र दिली जाणार आहेत. जिल्हास्तरावर होणाऱ्या शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमानंतर पात्र निवडक उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरित केली जाणार आहेत. (Appointment letter on Maharashtra day)

उन्हाची तीव्रता लक्षात घेता एकत्रित २ हजार २ उमेदवारांना नियुक्ती पत्रप्रदान करणे सोयीचे नसल्याने, मुंबई तसेच जिल्हा स्तरावर प्रत्येकी १० उमेदवारांना पालकमंत्र्यांच्या हस्ते तर, २ व ३ मे रोजी नियुक्ती प्राधिकारी यांच्या हस्ते उर्वरित उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा : वा! याला म्हणतात मैत्री , तीन जीवलग मैत्रिणी एकाच वेळी झाल्या पोलीस

शासनाद्वारे आयोजित विविध परीक्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. सर्वाधिक नियुक्तीपत्र ही महसूल विभागातील असणार आहेत. भूकरमापक (गट क) या पदाच्या एक हजार २६८ पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी झाली आहे. तर, मराठी भाषा विभागातील सहायक भाषा संचालक (गट ब) पदासाठी एक उमेदवार, औषधी द्रव्ये (गट ब) वैज्ञानिक अधिकारी या पदाच्या पाच उमेदवारांच्या कादगतपत्रांची पडताळणी झाली आहे.

त्याचप्रमाणे, राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक (गट क) या पदाचे ११४ उमेदवार, परिवहन विभागातील सहायक मोटर वाहन निरीक्षक (गट क) या पदाचे १७७ उमेदवार, वित्त विभागातील राज्यकर निरीक्षक (गट क) ६९७ उमेदवार, विधि व न्याय विभागातील अवर सचिव (गट अ) या पदाचे ११ उमेदवार, सार्वजनिक आरोग्य विभागातील (गट अ) पदाच्या २२४ उमेदवार अशा एकूण २ हजार ४९७ उमेदवारांपैकी दोन हजार दोन उमेदवारांना कागदपत्रांची पडताळणी करुन नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहेत.