कुलगुरू पदासाठी कुणाचं पारडं जड? पाचही जण आहेत मातब्बर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या मुलाखतीसाठी २७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यातील याच विद्यापीठातील चार उमेदवारांची अंतिम मुलाखतीसाठी निवड झाली आहे. तर एक उमेदवार विद्यापीठाबाहेरील आहे.

कुलगुरू पदासाठी कुणाचं पारडं जड? पाचही जण आहेत मातब्बर
SPPU Vice Chancellor

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू (SPPU Vice Chancellor) पदासाठी पाच उमेदवारांची नावे अंतिम मुलाखतीसाठी निश्चित करण्यात आली आहेत. पुढील काही दिवसांतच विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळतील. पण या पाच जणांमधून कुणाची निवड होणार, कुणाचे पारडे जड आहे, याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. (Savitribai Phule Pune University VC)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या मुलाखतीसाठी २७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यातील याच विद्यापीठातील चार उमेदवारांची अंतिम मुलाखतीसाठी निवड झाली आहे. तर एक उमेदवार विद्यापीठाबाहेरील आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर (Parag kalkar),पुणे विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. अविनाश कुंभार (Avinash Kumbhar), भौतिकशास्त्र विभागातील डॉ.संजय ढोले (Sanjay Dhole), पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रा. सुरेश गोसावी (Suresh Gosawi) आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. विजय फुलारी (Vijay Phulari) या पाच उमेदवारांची निवड करण्यात आल्याचे समजते. या पाच जणांमध्ये कुलगुरू पदासाठी मोठी स्पर्धा असेल.

हेही वाचा : अशी झाली शैक्षणिक धोरणांची ऐतिहासिक वाटचाल; पुराण ते आजचे धोरण

डॉ. पराग काळकर  

डॉ. पराग काळकर सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता असून, त्यांच्याकडे सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या संचालक पदाचीही जबाबदारी आहे. डॉ. काळकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत शैक्षणिक परिषद सदस्य, सिनेट सदस्य आणि  विविध परीक्षा आणि शैक्षणिक समित्यांवर होते. तसेच ते सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये २१ वर्षांहून अधिक काळ विविध पदांवर कार्यरत आहेत. याशिवाय असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल्स (AIMS) चे खजिनदार म्हणूनही त्यांनी काम केले आहे. डॉ. काळकर यांच्याकडे  M.Com, MMS (फायनान्स), PhD आणि FDP (IIMA) या विषयांची पदवी  आहे.  त्यांना  २४ वर्षांपेक्षा जास्त अध्यापनाचा अनुभव आहे.

डॉ. संजय ढोले

डॉ. संजय ढोले हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या  भौतिकशास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत. तसेच विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे  संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी  न्यूक्लियर, एक्सीलरेटर, रेडिएशन फिजिक्स आणि नॅनोमटेरियल या क्षेत्रात संशोधन केले आहे. आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठित जर्नल्समध्ये डॉ. ढोले यांचे  ३०० हून अधिक संशोधन पेपर प्रकाशित झाले आहेत. त्यांनी सुमारे ३५ विद्यार्थ्यांना पीएच. डी. आणि एम.फिल. साठी मार्गदर्शन केले आहे. विज्ञान कथांची सहा पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यांचे  विविध वृत्तपत्रे, पुरवण्या  आणि मासिकांमध्ये ५०० हून अधिक वैज्ञानिक लेखही प्रकाशित केले आहेत. त्यांच्या पुस्तकांना  महाराष्ट्र शासनाचे व विविध संस्था संघटनांचे सुमारे ११ पुरस्कार मिळाले आहेत.

डॉ. विजय फुलारी 

डॉ. विजय फुलारी हे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागाचे माजी प्रमुख आहेत. डॉ. फुलारे यांनी भौतिक शास्त्र या विषयातून पीएच. डी., एम. एससी. , बी. एससी. ची पदवी घेतली आहे. त्यांनी डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेचे सदस्य, UGC चे प्रकल्प समन्वयक,  प्रकल्प अन्वेषक, शिवाजी विद्यापीठातील विविध महाविद्यालयांच्या संलग्न समित्यांचे प्रमुख, सोलापूर परीक्षा नियंत्रक निवड समितीचे सदस्य आदी पदे भूषवली आहेत. डॉ. फुलारी यांनी ८ राष्ट्रीय आणि ६  आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पांमध्ये सहयोग केला आहे. त्यांना ३२ वर्ष अध्यापनाचा अनुभव असून ते मागील २७ वर्षांनपासून संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. 

डॉ. सुरेश गोसावी 

डॉ. सुरेश गोसावी हे सावित्रीबाई फुले पुणे विद्या[पिठाच्या पर्यावरणशास्त्र विभागात प्राध्यापक आहेत. डॉ. गोसावी यांनी एमएस्सी. पीएच. डी. पदवी मिळवली आहे. त्यांनी आतापर्यंत १० विषयांमध्ये संशोधन पेपर सादर केले आहेत. तर प्लाझ्मा पॉलिमरायझेशन वापरून लिथोग्राफी आणि नमुना हस्तांतरण,  ड्राय इलेक्ट्रॉन बीम संश्लेषण,  मल्टी-इलेक्ट्रॉन बीम लिथोग्राफी सिस्टम डिझाइन, नॅनोमटेरियल्स, नॅनोटेक्नॉलॉजी मायक्रो फ्लुइड क्स,  सॉफ्ट लिथोग्राफी हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत. 

डॉ. अविनाश कुंभार

डॉ. अविनाश कुंभार हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी रसायनशास्त्र विभागातून पीएच. डी., एमएससी आणि बीएससी ची पदवी घेतली आहे. डॉ. कुंभार यांना सुमारे ३३ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे. त्यांनी २१ संशोधन पेपर सादर केले आहेत. डॉ. कुंभार यांचे सुप्रामोलेक्युलर केमिस्ट्री,  रेडिओलिसिस यांसह संबंधित विविध विषयांवर संशोधन केले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2