स्वातंत्र्य लढ्यातील शास्त्रज्ञांचे योगदान मोलाचे - डॉ. शरद कुंटे

केवळ स्वातंत्र्य मिळवून गरिबी दूर होणार नाही. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती, उत्पादन वाढ, निर्यात वाढ या मार्गाने देशापुढचे आर्थिक प्रश्न सुटतील याची शास्त्रज्ञांना जाणीव होती. त्यासाठी विज्ञानातील ज्ञान उपयुक्त ठरले.

स्वातंत्र्य लढ्यातील शास्त्रज्ञांचे योगदान मोलाचे - डॉ. शरद कुंटे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

देशातील गरिबी, अज्ञान, रूढिप्रियता यातून तत्कालीन समाजाला बाहेर काढण्यासाठी स्वातंत्र्य चळवळीतील शास्त्रज्ञांचे योगदान मोलाचे होते, असे मत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ( डीईएस ) नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि विचारवंत डॉ. शरद कुंटे यांनी व्यक्त केले.

 केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय, विज्ञान भारती, आझादी का अमृत महोत्सव आणि फर्ग्युसन महाविद्यालय ( स्वायत्त ) यांच्या वतीने लोकमान्य टिळक आणि शास्त्रज्ञ आचार्य डॉ. प्रफुल्लचंद्र राय यांच्या जयंतीनिमित्ताने ' स्वातंत्र्य लढ्यातील शास्त्रज्ञांचे योगदान या विषयावर डॉ. कुंटे बोलत होते. यावेळी विज्ञान भारतीचे पश्चिम क्षेत्राचे सचिव श्रीप्रसाद, डीईएसचे कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, प्रभारी प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी, उपप्राचार्या स्वाती जोगळेकर,  नारायण कुलकर्णी, शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर आदी उपस्थित होते. 

 कुंटे म्हणाले, भारत हा मागासलेला देश आहे हा ब्रिटिशांनी निर्माण केलेला गैरसमज धुवून काढण्याचे काम शास्त्रज्ञांनी केले. इंग्रज येण्यापूर्वी भारतातील विज्ञान व तंत्रज्ञान, औषधशास्त्र, आरोग्य सुरक्षा किती प्रगत होत्या हे शास्त्रज्ञांनी जगाला पटवून दिले. त्यासाठी डॉ. प्रफुलचंद्र राय यांचे कार्य महत्त्वाचे आहे. तसेच केवळ स्वातंत्र्य मिळवून गरिबी दूर होणार नाही. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती, उत्पादन वाढ, निर्यात वाढ या मार्गाने देशापुढचे आर्थिक प्रश्न सुटतील याची शास्त्रज्ञांना जाणीव होती. त्यासाठी विज्ञानातील ज्ञान उपयुक्त ठरले.

 श्रीप्रसाद म्हणाले, ' भारतात राज्य करण्यासाठी इंग्रजांनी आधुनिक विज्ञानाचा माध्यम म्हणून उपयोग केला. त्याला विज्ञानानेच प्रत्युत्तर देण्याची गरज लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंदांसारख्या द्रष्ट्या नेत्यांनी ओळखली. टिळकांनी ' गीता रहस्य ' या ग्रंथात आणि विवेकानंदांनी पाश्चात्य देशात हिंदू धर्म समजावून सांगण्यासाठी विज्ञानाचा आधार घेतला असल्याचे दिसून येते. '

 या वेळी ' सृष्टिज्ञान ' या मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. मानसी माहेगावकर यांनी सूत्रसंचालन आणि प्राचार्य कुलकर्णी यांनी स्वागत केले.