पवित्र पोर्टलवर नोंदणी तरी सुरू करा! शिक्षक भरतीसाठी उमेदवारांचा टाहो, रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पावसाळी अधिवेशनात शिक्षक भरतीची प्रक्रिया १५ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची घोषणा केली होती.

पवित्र पोर्टलवर नोंदणी तरी सुरू करा! शिक्षक भरतीसाठी उमेदवारांचा टाहो, रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
Teachers Recruitment in Maharashtra

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील शिक्षक भरतीचा (Teachers Recruitment) प्रश्न आता चिघळण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेत भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली. तसेच यावर तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. राज्यभरात इच्छूक उमेदवारांकडूनही भरतीसाठी सातत्याने आवाज उठवला जात असून आंदोलनेही सुरू आहेत. किमान पवित्र पोर्टलवर (Pavitra Portal) पात्र उमेदवारांची नोंदणी तरी सुरू करावी, अशी मागणीही केली जात आहे. (Maharashtra Recruitment News)

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (School Education Minister Deepak Kesarkar) यांनी पावसाळी अधिवेशनात शिक्षक भरतीची प्रक्रिया १५ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी भरतीचे संपूर्ण वेळापत्रकच जाहीर केले होते. पण अजूनही ही प्रक्रिया सुरू न झाल्याने उमेदावारांमधील नाराजी वाढू लागली आहे.

दहावी व बारावी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश  

याबाबत रोहित पवार यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. २०२२ च्या संच मान्यतेनुसार सध्या राज्यात ६७ हजार शिक्षक पदे रिक्त असून १५ व्या वित्त आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार रिक्त पदांच्या ८० टक्के म्हणजे जवळपास ५५ हजार शिक्षकांची भरती अपेक्षित आहे. गेल्या वर्षभरापासून शिक्षक आणि प्राध्यापक भरतीच्या केवळ पोकळ घोषणा होत असून कोणत्याही प्रकारची प्रक्रिया होत नसल्याने लाखो उमेदवारांमध्ये शासन आपली फसवणूक करत असल्याची भावना निर्माण झाली आहे, पवार यांनी म्हटले आहे.

याच अनुषंगाने शासनाने तात्काळ शिक्षक व प्राध्यापक भरती प्रक्रिया कागदावर नव्हे तर प्रत्यक्षात सुरू करावी. यावर तातडीने कार्यवाही सुरू न केल्यास नाईलाजास्तव पात्र उमेदवारांसोबत मला आंदोलनाला बसावे लागेल, असा इशारा पवार यांनी दिला आहे. महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा समन्वय समितीनेही पवित्र पोर्टल सुरू करण्याची मागणी केली आहे.

राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे पवित्र प्रणालीद्वारे लवकरच भरणार असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर नेहमीच सांगत असतात. परंतू, शिक्षक भरतीची प्रक्रिया ऑगस्ट महिना संपत आला असता तरी राज्याच्या शिक्षण विभागाला पवित्र पोर्टल सुरू करण्यात यश आले नाही. शिक्षण विभागाने तात्काळ पवित्र पोर्टल सुरू करून त्यावर उमेदवारांना नोंदणीची संधी द्यावी, अशी मागणी समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी केली आहे.