नामांकित शाळा बंद पडणे ही शोकांतिका

संचालक मंडळाने याबाबत निर्णय घेतल्याने अखेर शाळेला कायमचे कुलूप लागणार आहे.

नामांकित शाळा बंद पडणे ही शोकांतिका

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क : 

P Jog School News : पुण्यासारख्या शहरात विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे शाळा बंद पडत नाहीयेत, तर शिक्षण संस्था चालकांकडे शाळा चालवण्यासाठी पैसे नसल्यामुळे शाळा बंद पडत आहेत. आणि दुसरीकडे धार्मिक स्थळांसाठी आंदोलने सुरु आहेत, पण या शाळांसाठी कुणी पुढाकार घेत नाहीत, ही शोकांतिका आहे, अशी खंत राज्य शिक्षण संस्था संघटनेच्या उपाध्यक्षा जागृती धर्माधिकारी यांनी 'एज्युवार्ता' शी बोलताना व्यक्त केली.

शहरातील नामांकित शाळा पी. जोग (P Jog school closed) शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही पुण्यातील  कोथरूड परिसरातील एक\ नामांकित शाळ आहे. शाळेचे शुल्क इतर शाळांच्या तुलनेत कमी असल्याने मध्यमवर्गीय व सर्वसामान्य कुटुंबातील मुले या शाळेत प्रवेश घेतात. गेल्या काही दिवसांपासून ही शाळा बंद करण्याबाबत चर्चा सुरू होती. परंतु, संचालक मंडळाने याबाबत निर्णय घेतल्याने अखेर शाळेला कायमचे कुलूप लागणार आहे. मात्र, या निर्णयामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना इतर शाळेचा पर्याय शोधणे अडचणीचे होणार आहे.

यासंदर्भात जागृती धर्माधिकारी म्हणाल्या, " कोथरूड परिसरात बोटावर मोजण्या सारख्या शाळा आहेत ज्या चांगले शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध असल्यातरी अगदी सर्व सामान्यांना परवडतील अशा आहेत. त्यामुळे तिथले बरेच मिडल क्लास वर्गातील नागरिक या शाळांना प्राधान्य देतात. यापैकीच एक शाळा म्हणजे पी. जोग शाळा. ही शाळा तिथे दिल्या जाणाऱ्या चांगल्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. 

हेही वाचा : होय आम्ही पी जोग शाळा बंद करतोय ; अमोल जोग यांनी स्पष्ट सांगितले

मागील काही दिवसात शाळेतील गैरकारभार उघडकीस आला. पण यासाठी शाळेचे मॅनेजमेंट जबाबदार आहे, शाळा, तिथले शिक्षक किंवा विद्यार्थी नव्हे. " धर्माधिकारी म्हणाल्या, " पी. जोग सारखी दर्जेदार शिक्षण देणारी शाळा पैशांअभावी बंद पडत आहे, ही पुण्यातील प्रत्येक नागरिकासाठी शरमेची बाब आहे. RTE अंतर्गत थकीत असलेली रक्कम शासनांकडून वेळेत दिली गेली नाही, काही पालक शाळेची फी भरू शकले नाहीत, यामुळे आर्थिक नुकसानीमुळे ही शाळा बंद पडली जात आहे.

पण याचा फटका वेळेवर शुल्क भरणाऱ्या आणि चांगले शिक्षणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणार आहे. काही पालकांमुळे आणि शासनाच्या हलगर्जीपणाचा फटका या विद्यार्थ्यांना बसणार आहे. या विद्यार्थ्यांना आता नवीन शाळेत प्रवेश घ्यावा लागणार आहे." सर्वसामान्यांना परवडणारे आणि दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्था टिकवून ठेवणे ही फक्त त्या शाळेची स्वतःची जबाबदारी नाही. कारण शाळेने RTE अंतर्गत गरीब वर्गातील मुलांना शिक्षण दिले, पण शासनाने त्यांना त्यांचे शुल्क दिले नाही. 

हेही वाचा : वा ! भारीच...एकट्या कोकणात 15 दिवसात शिक्षकांच्या 6 हजार जागा भरणार

शहरात अनेक सामाजिक संस्था आहेत, ज्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करतात. अशा सामाजिक संस्थांनी शाळांच्या मदतीसाठी पुढे यावे, शासनाने पालकांच्या आर्थिक मदतीसाठी एखादी योजना आखावी, शाळांच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मदतीचा हात पुढे करून शाळांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करावी, असे आवाहन ही धर्माधिकारी यांनी केले.

"शाळा बंद पडून त्या जागी दुसरी इमारत उभारून त्याचा व्यावसायिक उपयोग करण्याची परंपरा अशा घटनांमुळे रुजू होईल, असे झाल्यास हे आपल्या शिक्षणाभिमुख समाजासाठी धोक्याचे ठरेल. पैसे नसल्यामुळे शाळा बंद पडणे, हा चुकीचा पायंडा पडत आहे, असा इशाराही यावेळी धर्माधिकारी यांनी दिला.