होय आम्ही पी जोग शाळा बंद करतोय ; अमोल जोग यांनी स्पष्ट सांगितले

होय आम्ही पी जोग शाळा बंद करतोय ; अमोल जोग यांनी स्पष्ट सांगितले

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुण्यातील कोथरूड (kothrud) परिसरामधील सुपरीचीत असणारी पी जोग शाळा बंद (P Jog school closed) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागणार आहे. 'येत्या दोन वर्षाच्या कालावधीत आम्ही शाळा बंद करणार आहोत', असे शाळेचे संचालक अमोल जोग (School Director Amol Jog) यांनी 'एज्युवार्ता' शी बोलताना सांगितले.

कोथरूड परिसरातील नामांकित शाळांपैकी एक शाळा म्हणून पी जोग शाळेकडे पाहिले जाते. शाळेचे शुल्क इतर शाळांच्या तुलनेत कमी असल्याने मध्यमवर्गीय व सर्वसामान्य कुटुंबातील मुले या शाळेत प्रवेश घेतात. गेल्या काही दिवसांपासून ही शाळा बंद करण्याबाबत चर्चा सुरू होती. परंतु,संचालक मंडळाने याबाबत निर्णय घेतल्याने अखेर शाळेला कायमचे कुलूप लागणार आहे. मात्र, या निर्णयामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना इतर शाळेचा पर्याय शोधणे अडचणीचे होणार आहे.

हेही वाचा : वा ! भारीच...एकट्या कोकणात 15 दिवसात शिक्षकांच्या 6 हजार जागा भरणार

अमोल जोग म्हणाले, आम्ही विद्यार्थ्यांकडून माफक शुल्क घेतो. जमा होणाऱ्या शुल्कात शाळा चालवणे अवघड जात आहे. शाळेच्या शिक्षकांचे वेतन इतर खर्च करणे शक्य होत नाही. गेल्या तीन वर्षांपासून आम्ही हा आर्थिक भार कसाबसा सोसत आहोत. वारंवार मागणी करूनही पालकांकडून वेळेत शुल्क जमा होत नाही. तसेच शासनाकडून आरटीई  शुल्क प्रतिकृतीची रक्कमही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे आम्ही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

पी जोग शाळा बंद होणार असली तरी एकाही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत. सुमारे ५० टक्के विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये प्रवेश देण्याबाबत हालचाली केल्या आहेत. येत्या दोन वर्षात टप्प्याटप्प्याने शाळा बंद होईल. शाळा ही कायम विना अनुदानित असल्याने ती चालवणे आता आम्हाला शक्य नाही, असेही अमोल जोग यांनी सांगितले.

दरम्यान,पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांना पी जोग शाळा बंद बाबत विचारले असता, या संदर्भात अद्याप शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.