कोरोनानंतर महाविद्यालयातील उपस्थिती घटली; विद्यार्थी परीक्षा अर्जही भरेनात

कोरोनामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. या परीक्षांचा निकाल तब्बल ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले होते.

कोरोनानंतर महाविद्यालयातील उपस्थिती घटली; विद्यार्थी परीक्षा अर्जही भरेनात
College class representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क                        

कोरोना (Covid 19) काळात विद्यार्थ्यांना (Students) नाईलाजाने ऑनलाइन पद्धतीने शिक्षण (Online Education) द्यावे लागले. परिणामी एका जागेवर वर्गात बसून एकाग्रतेने शिक्षण घेण्यात खंड पडला. मात्र, त्याचे विपरीत परिणाम आता महाविद्यालयांमध्ये (College) दिसून येत आहेत. विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती प्रचंड प्रमाणात घटली असून निकाल खालवला आहे. त्यामुळे  इयत्ता बारावीनंतर पुढे शिक्षणच नको, अशी काहीशी मानसिकता अनेक विद्यार्थ्यांनी स्वीकारली असल्याचे महाविद्यालयांचे प्राचार्य सांगत आहेत.                                      

कोरोनामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. या परीक्षांचा निकाल तब्बल ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले होते. विद्यार्थ्यांना एमसीक्यू स्वरूपातील प्रश्नांची सवय लागली. दीर्घोत्तरी प्रश्न विद्यार्थ्यांना आता नकोसे वाटू लागले आहेत. कोरोनामध्ये ऑनलाइन लेक्चरच्या आधारे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पण प्रथम वर्षात आल्यानंतर दीर्घोत्तरी प्रश्न लिहिणे अनेक विद्यार्थ्यांना अवघड गेले. त्यामुळे सुमारे ४३ ते ४५ टक्के विद्यार्थी प्रथम वर्षात नापास झाल्याचे प्राचार्य सांगत आहेत.

हेही वाचा : पुणे विद्यापीठात प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरला का? इथे वाचा सविस्तर माहिती

खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे (Dr. Sanjay Chakne) म्हणाले, कोरोनाचे दूरगामी परिणाम आता दिसू लागले आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी झाली आहे. पहिल्या सेमिस्टरमध्ये सुमारे ४३ ते ४५ टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत. परिणामी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी परीक्षा अर्ज भरण्यासाठी पुढे येत नाहीत. शिक्षकांनी परीक्षा अर्ज भरण्यासाठी संपर्क साधला असता फोन उचलत नाही. उचललेला फोन शिक्षकांशी संवाद न साधताच बंद करतात. परीक्षा अर्ज भरण्यासाठी उत्सुक नसल्याचे दाखवतात. कोरोनानंतर विद्यार्थ्यांच्या वागण्या बोलण्यात बदल झाला आहे. ही बाब गंभीर असून त्याकडे वेळीच लक्ष द्यावे लागणार आहे.

शिरूर येथील सी. टी. बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते (Dr. K. C. Mohite) म्हणाले, आमच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीला प्राधान्य दिले जाते. मात्र अलीकडे विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी झाली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेऊन नोकरी करण्याऐवजी इयत्ता बारावीच्या पात्रतेवरच पोलीस भरतीची तयारी करण्याचा किंवा अग्नीवीर होण्याकडे विद्यार्थ्यांचा कल दिसून येत आहे. सेमिस्टर पॅटर्न, क्रेडिट सिस्टीम आदी यामुळे परीक्षांची संख्या वाढली आहे. त्यातच वर्गात बसलेला नाही म्हणून आपले काही बिघडत नाही, अशी विद्यार्थ्यांची मानसिकता तयार झाली आहे. परंतु त्याचा परिणाम निकालावर दिसत असल्याने द्वितीय सत्राचा परीक्षा अर्ज भरण्यास विद्यार्थी उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे.

 ''आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती समाधानकारक आहे. कोरोनानंतर विद्यार्थ्यांच्या वागणा-बोलण्यात काही प्रमाणात बदल झाल्याचे नक्कीच दिसून येते. परिस्थिती सुधारण्यास आणखी काही कालावधी लागेल, असे वाटते.''

- डॉ. राजेंद्र झुंजारराव,

प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2