प्र-कुलगुरू नसल्याने रखडली अधिष्ठातांची निवड? अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ

प्र-कुलगुरूपदी (Pro VC) कोणाची वर्णी लागणार याबाबतचा निर्णय ऑगस्ट महिना अखेरीस होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.

प्र-कुलगुरू नसल्याने रखडली अधिष्ठातांची निवड? अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ
Savitribai Phule Pune University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क         

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) अधिष्ठाता पदाच्या (Dean) निवडीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. प्र-कुलगुरूंची निवड होत नसल्याने त्याआधीच अधिष्ठाता पदांची निवड होऊ नये, यासाठी ही मुदतवाढ दिल्याची चर्चा आता विद्यापीठ वर्तुळात सुरू आहे. अधिष्ठाता पदासाठी पुर्वी १८ ऑगस्ट ही अंतिम मुदत होती. त्यासाठी सात दिवस बाकी असताना विद्यापीठ प्रशासनाने मुदतवाढ दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  (Savitribai Phule Pune University News)

प्र-कुलगुरूपदी (Pro VC) कोणाची वर्णी लागणार याबाबतचा निर्णय ऑगस्ट महिना अखेरीस होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. या पुढील काळात दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची (Management Council) बैठक घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे प्र-कुलगुरू पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना महिना अखेरपर्यंत वाट पहावी लागणार असल्याचे दिसते.

SPPU News : विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंची नियुक्ती महिना अखेरीस?

सध्या विज्ञान व तंत्रज्ञान, आंतरविद्याशाखीय अभ्यास, मानव्यविज्ञानसाठी आणि वाणिज्य व व्यवस्थापन या चार विद्याशाखांच्या अधिष्ठाता पदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी इच्छूकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आतापर्यंत ५० हून अधिक अर्ज आले असून सर्वाधिक अर्ज विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी आहेत. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १८ ऑगस्टपर्यंत देण्यात आली होती. ही मुदत संपण्यास अजूनही सात दिवस बाकी आहेत. पण त्याआधीच विद्यापीठ प्रशासनाने घाईने मुदतवाढ दिल्याचे पत्रिपत्रक काढले आहे. त्यानुसार ऑनलाईन अर्ज २८ ऑगस्टपर्यंत करता येणार आहेत. तर प्रत्यक्ष ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावा लागेल.

प्रशासनाच्या या परित्रपकांमुळे विद्यापीठात चर्चा सुरू झाल्या आहेत. विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंची निवड अद्याप झालेली नाहीत. त्यावरूनही अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. राजकीय हस्तक्षेपाचेही आरोप केले जात आहेत. प्र-कुलगुरूंच्या निवडीसाठी अधिष्ठातांची निवड करणे योग्य नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे आधी प्र-कुलगुरू आणि त्यानंतर अधिष्ठातांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठीच अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची चर्चा आहे.

दरम्यान, पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदी डॉ. सुरेश गोसावी (Dr. Suresh Gosavi) यांची निवड झाली. त्यानंतर असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, गेल्या अडीच महिन्यांपासून हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. राज्यातील इतर कुलगुरूंनी आठवड्याभराच्या आत प्र-कुलगुरूंची निवड केली. मात्र, काही कारणांमुळे विद्यापीठाच्या प्र-कलगुरूंची निवड दिवसेंदिवस लांबत आहे. काहींनी राजकीय हस्तक्षेपामुळे ही नियुक्ती लांबत असल्याचा आरोप केला आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo