औरंगाबादमधील आदिवासी पाडा ते अरूणाचल प्रदेश व्हाया पुणे! राहुलची गांधी फेलोशिपला गवसणी
राहुल मूळचा औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील वडाळा या गावचा रहिवासी आहे. सध्या तो माॅडर्न काॅलेज पुणे येथे राज्यशास्त्रातून पोस्ट ग्रज्यूएशन करत आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
भारतात अजूनही समाजातील काही घटक शिक्षणापासून (Education) वंचित आहेत. आजही दुर्गम भागातील मुलांना शिक्षण घेण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. परंतु अशाच दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी समाजातील (Tribal Area) राहुल इंगळे (Rahul Ingale) या विद्यार्थ्याची पिरामल फाउंडेशनकडून (Piramal Foundation) देण्यात येणाऱ्या गांधी फेलोशिपसाठी (Gandhi Fellowship) निवड झाली आहे. देशभरात नामांकित असलेल्या या फेलोशिपमध्ये महाराष्ट्रातून (Maharashtra) आदिवासी समाजातील विद्यार्थ्याची निवड झाल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
राहुल मूळचा औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील वडाळा या गावातील आहे. सध्या तो पुण्यातील माॅडर्न महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयातून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. राहुल राहत असलेल्या कोरेगाव पार्कमधील आदिवासी विकास विभागाच्या मुलांच्या शासकीय वसितगृहाचे गृहपाल व इतरांकडून राहुलला नेहमीच प्रोत्साहन मिळाले. तालुक्यातच बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून उच्च शिक्षणासाठी त्याने गुणवत्तेच्या जोरावर पुणे गाठले. इथे आल्यानंतर मागे वळून न पाहता त्याने जिद्दीला कष्टाची जोड देत थेट गांधी फेलोशिपला गवसणी घातली. या फेलोशिपसाठी देशभरातून हजारो विद्यार्थ्यांचे अर्ज येतात. त्यामध्ये राहुल वरचढ ठरला आहे.
हेही वाचा : पीएचडी, नेट नसतानाही प्राध्यापक; मंजूर पदांचे काय होणार? 'यूजीसी'चे नवे पोर्टल सुरू
गांधी फेलोशिपसाठी निवड झाल्यानंतर 'एज्युवार्ता'ने त्याच्याशी संवाद साधला. यावेळी राहुलने सांगितले की, वडाळा गावासह तेथील आजूबाजूच्या गावांमध्ये शिक्षणाचे प्रमाण खूप कमी आहे. तेथे लहानपणीच मुलांना ऊसतोडीसारखे काम करावे लागत असल्याने मुलांच्या शिक्षणाला फारसे महत्व दिले जात नाही. दुर्गम भागातील मुलांना हलाकीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी शिक्षण खूप महत्वाचे आहे. आर्थिक परिस्थिती सुधारून तेथे सर्वांगीण विकास करायचा असेल तर शिक्षण हाच एकमेव पर्याय आहे, असे म्हणत राहुलने दुर्गम भागातील मुलांच्या शिक्षणाच्या अवस्थेकडे लक्ष वेधले.
राहुलचे आई-वडील मोलमजुरी करता. तर भाऊ पडेल ते काम करून कसेबसे घर चालवितो. त्यामुळे राहुलला त्यांच्या कष्टाची जाण आहे. त्यानेही अनेक अडचणींचा सामना करत इथपर्यंतचा पल्ला गाठला आहे. आता फेलोशिपच्या माध्यमातून काम करण्यासाठी त्या थेट अरूणाचल प्रदेशात जाण्याची संधी मिळाली आहे. त्याला आरोग्य हा विषय देण्यात आला असून लवकरच त्याचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. फेलोशिपदरम्यान त्याला तालुका पातळीवरील आणि जिल्हा पातळीवरील आरोग्य अधिकाऱ्यांसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.
हेही वाचा : परदेशात उच्च शिक्षणासाठी शासनाची शिष्यवृत्ती ठरतेय मोठा आधार
दरम्यान, पिरामल फाऊंडेशनकडून देण्यात येणारी गांधी फेलोशिप आणि केंद्र शासनाकडून देण्यात येणारी फेलोशिप अशा दोन वेगवेगळ्या गांधी फेलोशिप आहेत. युवकांमध्ये सामाजिक बदलांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये नेतृत्व क्षमता विकसित करण्याच्या हेतूने पिरामल संस्थेची गांधी फेलोशिप देण्यात येते. तर केंद्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या गांधी फेलोशिपची सुरूवात २००८ मध्ये झाली होती. देशभरातील प्रतिभावान तरुणांना विविध क्षेत्रात कुशल नेते बनवणे हा शासनाकडून देण्यात येणाऱ्या गांधी फेलोशिपचा उद्देश आहे.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
eduvarta@gmail.com