पेपरफुटीमुळे पोलीस भरतीची फेरपरीक्षा घ्यावी का? समन्वय समितीने स्पष्ट केली भूमिका

लेखी परीक्षेदरम्यान हायटेक उपकरणांचा वापर केल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांना आधीच याबाबत कल्पना दिल्याचा दावा समितीने केला आहे. त्यानंतर आता फेरपरीक्षेबाबत समितीने आपली भूमिका मांडली आहे.

पेपरफुटीमुळे पोलीस भरतीची फेरपरीक्षा घ्यावी का? समन्वय समितीने स्पष्ट केली भूमिका
Mumbai Police Recruitment Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मुंबई पोलीस भरतीच्या (Mumbai Police Recruitment) लेखी परीक्षेदरम्यान पेपरफुटी झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) काही जणांना अटकही केली आहे. पण या घटनेमुळे भरतीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले असून भरतीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीची भावना आहे. याअनुषंगाने स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने फेरपरीक्षा घ्यावी की नाही, याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Competitive Examination)

लेखी परीक्षेदरम्यान हायटेक उपकरणांचा वापर केल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांना आधीच याबाबत कल्पना दिल्याचा दावा समितीने केला आहे. त्यानंतर आता फेरपरीक्षेबाबत समितीने आपली भूमिका मांडली आहे. समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर आणि सचिव निलेश गायकवाड यांनी म्हटले आहे की, मुंबई पोलीस भरती पेपरफुटीत सर्व टोळ्यांचा मागोवा घेण्यास यशस्वी ठरल्यास व प्रत्येक आरोपीला पोलिसांनी जेरबंद केल्यास फेरपरीक्षेची गरज नसेल असे आम्हाला वाटते. पोलीस भरतीत मुख्यत्वे ग्रामीण भागातील उमेदवार सामील झाले असल्याने प्रामाणिकपणे निवड झालेल्या उमेदवारांची निवड रद्द करणे उचित ठरणार नाही.

नोकरी, कुटुंब अन् अभ्यास अशी तारेवरची कसरत करत सोनाली मात्रे राज्यात मुलींमध्ये प्रथम

हजारापेक्षा जास्त घोटाळेबाज उमेदवार सापडल्यास त्याच्या जागी प्रामाणिकपणे अभ्यास केलेल्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना निवड यादीत समाविष्ट करण्याची संधी मिळेल. प्रामाणिकपणे अभ्यास करून निवड झालेल्या उमेदवारांवर अन्याय होऊ नये व मुंबई पोलिसांनी ज्या कसोशीने परीक्षा घेतल्या त्यांचे परिश्रम वाया जाऊ नये, अशी आमची इच्छा आहे. परंतु मुंबई पोलीस घोटाळ्याच्या मुळाशी पोचू शकले नाहीत किंवा अगदी शेवटच्या आरोपीला अटक करू शकले नाहीत किंवा समजा कोणाच्याही दबावापुढे तपास पुढे सरकू शकला नाही, तर फेरपरीक्षा घेण्यावाचून पर्याय नसेल, असेही समितीने स्पष्ट केले आहे.

सैन्यदलामध्ये अधिकारी पदासाठी पूर्व प्रशिक्षणाची संधी; निवास, भोजन सर्वकाही मोफत

आताच्या क्षणी कोणतीही एक भूमिका घेणे योग्य ठरणार नाही, या पेपरफुटीच्या तपासाअंतीच योग्य तो निर्णय घेणे उचित ठरेल. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा विस्तार राज्यभर असून या गैरप्रकारात अन्याय होत असल्याचे जाणवल्यास आम्ही राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यास तत्पर असू. तपासावर आमचे लक्ष असून, राज्य सरकार तसेच मुंबई पोलिसांशी तपासाबाबत आमचे नेहमी सहकार्य असेल व त्यांनीही सदर तपास पारदर्शकरीत्या लवकर पूर्ण करून आमच्यासमोर सर्व वस्तुस्थिती मांडावी, असे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo