ट्रोलिंग, अपमान जनक बोलणे आदींची लागण न झालेल्या शिक्षकांनी स्वत:ला जपा : शिक्षण आयुक्त सूरज मांढरे

तुम्ही विद्यार्थी घडवणार आहात. तुम्ही खऱ्या अर्थाने सर्व गोष्टींची ताकद होणारा आहात. त्यामुळे तुम्ही स्वतःला जपलं पाहिजे.

ट्रोलिंग, अपमान जनक बोलणे आदींची लागण न झालेल्या शिक्षकांनी स्वत:ला जपा  : शिक्षण आयुक्त सूरज मांढरे
Education Commissioner Suraj Mandhare

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षक भरतीसाठी (Teacher Recruitment) भावी शिक्षक  म्हणून जे मैदानात उतरलेले आहेत. त्यांची भाषा, त्यांची ट्रॉलिंगची पद्धती, त्यांनी शासन निर्णय न वाचता उपस्थित केलेले प्रश्न, हे चित्र थोडे चिंताजनक आहे. मात्र,अजूनही  ट्रोलिंग, अपमान जनक बोलणे, चुकीच्या पद्धतीने मेसेज पोहोचविणे (Trolling, insulting, misrepresenting messages) या रोगांची लागण ज्यांना झालेली नाही. त्यांनी स्वतःला जपावं. कारण तुम्ही शिक्षक होणार आहात, तुम्ही विद्यार्थी घडवणार आहात. तुम्ही खऱ्या अर्थाने सर्व गोष्टींची ताकद होणारा आहात. त्यामुळे तुम्ही स्वतःला जपलं पाहिजे, असा सल्ला राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे (Education Commissioner Suraj Mandhare) यांनी भावी शिक्षकांना दिला.तसेच काहींच्या चूकच्या वर्तवणूकीबद्दल खेदही व्यक्त केला. 

राज्यात शिक्षक भरती बाबतची प्रक्रिया सुरू असून त्यावर इंग्रजी- मराठी माध्यमातील शिक्षक यासह विविध प्रश्नांवरून वाद सुरू आहे. काही संघटनांनी अजूनही शिक्षक भरती प्रक्रियेबाबत आंदोलनाचे भूमिका घेतली आहे. मात्र, शिक्षक भरती संदर्भातील बहुतांश सर्व प्रश्नांची उत्तरे देणारा व्हिडिओ राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी समाज माध्यमातून प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षण आयुक्तांनी भावी शिक्षकांना सल्ला दिला आहे.

हेही वाचा : शिक्षण ASER 2023 Report news : असरचा रिपोर्ट जाहीर : युवकांना वाचायला अन् गणित सोडवायला येईना; सर्वाधिक विद्यार्थी घेतायेत कला शाखेत शिक्षण

सुरज मांढरे म्हणाले, शिक्षण विभागात काम करत असताना केवळ आणि केवळ विद्यार्थी हित विचारात घेऊनच आम्ही सर्व काम करत असतो. शिक्षक भरती प्रक्रिया शिक्षण विभागातर्फे व्यवस्थित पार पाडली जाईल, याबाबत न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांना योग्यपणे सामोरे जाऊन न्यायालयाचे समाधान करू. सर्वांना समसमान न्याय दिल्याची भावना प्रत्येकाला वाटेल,अशा पद्धतीने भरती प्रक्रिया राबवू. पण समाधान किती लोकांचे होईल, याची मी शाश्वती देऊ शकत नाही. 

फेसबुक वरून प्राप्त झालेल्या प्रश्नांचा विचार करता जणू काही आपण शंभर टक्के इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची भरती करणार आहोत, मराठी माध्यमाच्या शिक्षकांची भरातीच  करणार नाही, असा अनेकांचा समज झाला आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे अनेक उमेदवार व्यक्त होत असल्याचे दिसून आले आहे. मात्र सर्व बारकाईने अध्यादेशांचा अभ्यास केला तर त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होणार नाहीत. फेसबुकवर अनेक उमेदवारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा मी प्रयत्न केला. काही उमेदवारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली; तरी त्यांचे समाधान होणार नाही, अशा उमेदवारांना मी उत्तरे दिली नाहीत. कितीही कुणी अपमान जनक बोलले तरी मी त्यांना काही म्हणालो नाही. परंतु, जाणीव करून दिली आहे कि चुकीच्या पद्धतीने मांडणी केल्यास प्रक्रिया धोक्यात येऊ शकते, असेही मांढरे यांनी सांगितले.