मुख्याध्यापक महामंडळाने सुद्धा घातला 'निरक्षर सर्वेक्षणावर ' बहिष्कार 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने सुद्धा  या सर्वेक्षणावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्याध्यापक महामंडळाने सुद्धा घातला 'निरक्षर सर्वेक्षणावर ' बहिष्कार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत (Navbharat Literacy Programmes) निरक्षरांचे सर्वेक्षण ( Survey of illiterates ) करण्याबाबत राज्याच्या योजना संचालनालयाकडून (Directorate of Planning) संबंधित अधिका-या मार्फत शिक्षकांना आदेश देण्यात आले आहेत. परंतु, राज्यातील बहुतांश शिक्षक संघटनांनी या सर्वेक्षणावर बहिष्कार घातला आहे. त्यात आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने सुद्धा  या सर्वेक्षणावर बहिष्कार (Boycott the survey) घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी कोणाकडे देणार ?  असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शिक्षकांना शालाबाह्य कामे देता येत नाहीत. त्यातच विद्यार्थ्यांच्या शिकवण्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे सर्वेक्षणाचे काम शिक्षकांना देऊ नये, असे विनंतीचे पत्र विविध प्राथमिक संघटनांनी योजना विभागाचे संचालक महेश पालकर यांना दिले आहे. परंतु, निराक्षरांना साक्षर करणे ही आपलीच जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व शिक्षकांनी या कामात सहकार्य करावे, असे आवाहन पालकर यांनी परिपत्रकाद्वारे केले होते. परंतु, या आवाहनाला शिक्षक संघटनांनी प्रतिसाद दिला नाही. या उलट आता मुख्याध्यापक संघटनेने सुध्दा शिक्षक संघटनांना पाठिंबा दिला असून योजना संचालकांना याबाबत निवेदन दिले आहे. 

गेल्या दहा वर्षांपासून वेळोवेळी शिक्षक / कर्मचारी भरती बंदीमुळे तसेच 2017 पासून पवित्र पोर्टल मार्फत होणारी भरती होऊ न शकल्यामुळे अनेक माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. शाळेतील शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे उपलब्ध शिक्षकांकडून इतर विषयांचे अध्यापन करून घेतले जात आहे. परिणामी शिक्षकांवर ताणतणाव निर्माण होत आहे. त्यातच सर्वेक्षणाच्या आदेशामुळे कामाचा ताण अधिक वाढणार आहे. अनेक शिक्षकांना त्यांच्या वयोमानानुसार सर्वेक्षणाचे काम शक्य होणार नाही,असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्हा मुख्याध्यापक संघटनांनी मुख्याध्यापक महामंडळाकडे सर्वेक्षणाच्या कामातून वगळण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना सर्वेक्षणाच्या कामामधून न वगळल्यास मुख्याध्यापक महामंडळाचा या सर्वेक्षणावर बहिष्कार असेल, असे निवेदन मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे. के.  पाटील, सचिव शांताराम पोखरकर आणि उपाध्यक्ष आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी योजना विभागाला दिले आहे.