नांदेडच्या सरकारी शाळांमधील विद्यार्थी प्रवेशाची स्थिती चिंताजनक; असरचा धक्कादायक अहवाल 

असारच्या अहवालानुसार नांदेड जिल्ह्यात सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांचे प्रमाण १३.५%, तर मुलींचे प्रमाण केवळ १५ .९% इतके आहे.

नांदेडच्या सरकारी शाळांमधील विद्यार्थी प्रवेशाची स्थिती चिंताजनक; असरचा धक्कादायक अहवाल 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्रातील सरकारी शाळांविषयीची विदारक स्थिती अनेकवेळा कानावर पडते.त्यात आता ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशनल रिपोर्ट (Annual Status of Education Report -ASER )अर्थात असरच्या अहवालाने महाराष्ट्रातील नांदेड जिलह्यातील सरकारी शाळांच्या (Government Schools in Nanded District) स्थितीवरील चिंताजनक माहिती समोर आणली आहे.असरच्या सर्वेक्षणात देशातील २६ राज्यांमधील २८ जिल्ह्यांची पाहणी करण्यात आली होती. यामध्ये राज्यातील नांदेड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला  होता. सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेण्याच्या बाबतीत नांदेड जिल्हा देशात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत शेवटच्या क्रमांकावर आहे 
.
 असारच्या अहवालानुसार नांदेड जिल्ह्यात सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांचे प्रमाण १३.५%, तर मुलींचे प्रमाण केवळ १५ .९% इतके आहे. तर सरकारी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या १७ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये १०.२ टक्के विद्यार्थी आणि ७.५ टक्के विद्यार्थिनी आहेत.तसेच ३.५ टक्के विद्यार्थी व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश घेत आहेत.

हेही वाचा : ASER 2023 Report news : असरचा रिपोर्ट जाहीर : युवकांना वाचायला अन् गणित सोडवायला येईना; सर्वाधिक विद्यार्थी घेतायेत कला शाखेत शिक्षण

देशात सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये बंगाल राज्यातील कूचबिहार जिल्ह्याचा क्रमांक लागतो. त्यानंतर उत्तराखंड राज्यातील टिहरी गढवाल या जिल्ह्याचा समावेश होतो. त्यानंतर भोपाळ, बनारस या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. सर्वात शेवटी महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याचा क्रमांक असून केवळ १४.९ विद्यार्थी नांदेड जिल्ह्यातील सरकारी शाळेत शिक्षण घेतात.

नांदेड जिल्ह्यात करण्यात आलेल्या पाहणीनुसार १४ ते १६ या वयोगटात इयत्ता दुसरीपर्यंतचे धडे वाचता येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७६.४ टक्के आहे तर १७-१८ वयोगटातील अशा विद्यार्थ्यांची संख्या ७९ टक्के आहे. हे  प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत बरे असल्याचे दिसते. तर अगदी सोपी सोपी बेसिक गणिते सोडवणाऱ्या १४ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या ३५.७ टक्के आहे तर १७ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या ३२.१ टक्के आहे.तसेच बेसिक इंग्रजीचं ज्ञान असणाऱ्या १४ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या ५०.६ टक्के तर १७ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या ६०.८ टक्के आहे.