तळेगावच्या इंजिनिअरिंग कॉलेजचा डंका! ‘इनोव्हेट यु टेकाथॉन २०२४’चे विजेतेपद पटकावले

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

तळेगावच्या  इंजिनिअरिंग कॉलेजचा डंका! ‘इनोव्हेट यु टेकाथॉन २०२४’चे विजेतेपद पटकावले

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी सूक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यास सोप्या करणारा प्रकल्प सादर करुन यंदाचे 'इनोव्हेट यु टेकाथॉन २०२४' चे (Innovate You Techathon 2024) विजेतेपद मिळवले. तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील नुतन महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेजच्या (New Maharashtra Engineering College) 'टेक अविण्या' या संघाने प्रथम क्रमांक मिळवत हा किताब पटकावला. तर नाशिकच्या के. के. वाघ इंजिनिअरिंगच्या (K. K. Wagh Engineering College Nashik) विद्यार्थ्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आणि मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग काॅलेजने (Modern College of Engineering Pune) तृतीय क्रमांकावर बाजी मारली. विजेत्या संघाना एकूण चार लाख पंचवीस हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. 'एआय' आणि तंत्रज्ञानातील संशोधनाला आजची पिढी पुढे जाऊन व्यवसाय म्हणून बघते आहे. नव्या पिढीचे ‘जुगाड’ तंत्रज्ञान भविष्यात शाश्वत काम करेल, अशी आशा डॉ. गोसावी यांनी यावेळी व्यक्त केली.  

परिक्षक रोहीदास गव्हाणे म्हणाले , ‘या स्पर्धेचा परिक्षक म्हणून काम करता आले याचा आनंद झाला. नागरी सेवेत काम करत असल्याने नागरिकांचे प्रश्न सोडवणारे प्रकल्प पाहून छान वाटले. या स्पर्धेत २०० संघ सहभागी झाले होते. त्यातील तीस संघांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली. यातून अंतिम विजेते संघाची निवड करण्यात आली. इनोव्हेशन फाउंडेशनच्या माध्यमातून व एआयएसएसएमएस आयओआयटी कॉलेज, पुणे यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  


_________________________________________

‘या स्पर्धेतील अनेक प्रकल्प हे उद्योजकतेकडे नेणारे होते. संशोधनातून उद्योजक विद्यार्थी घडावे हाच आमचा मूळ हेतू होता. तो खऱ्या अर्थाने कुठेतरी साध्य होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून आले. या स्पर्धेतील विजेत्या प्रकल्पांसह इतर प्रकल्पांनाही उद्योजकतेसाठी मदत हवी असल्यास इनोव्हेशन फाउंडेशन कडून करण्यात येईल. 

कल्पेश यादव , अध्यक्ष, इनोव्हेशन फाउंडेशन 
__________________________________________

छोट्या शहरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या हॅकाथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली व आम्ही विजेते ठरलो. शेकडो संघ असूनही अतिशय उत्तम नियोजन या स्पर्धेत करण्यात आले होते.

ध्रुवराज निकम, विजेता विद्यार्थी