तलाठी भरती : अर्ज भरण्यासाठी मुदतवाढीबाबत उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत महत्वाची माहिती

तांत्रिक कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्ज करता आला नाही. हा मुद्दा आमदार रोहित पवार यांनी बुधवारी विधानसभेत उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्ज भरण्याच्या मुदतवाढीबाबत सुतोवाच केले.

तलाठी भरती : अर्ज भरण्यासाठी मुदतवाढीबाबत उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत महत्वाची माहिती
Talathi Recruitment 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यात महसूल विभागाकडून (Revenue Department) तलाठी पदाच्या (Talathi Recruitment) ४ हजार ६४४ जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार इच्छूक उमेदवारांकडून २६ जून ते १८ जुलै या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात आले. मात्र, तांत्रिक कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्ज करता आला नाही. हा मुद्दा आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी बुधवारी विधानसभेत उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अर्ज भरण्याच्या मुदतवाढीबाबत सुतोवाच केले.

आमदार पवार यांनी विधानसभेत तलाठी भरतीसाठी अर्ज करण्याला १५ दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, कालही हा मुद्दा मांडला होता. उपमुख्यमंत्र्यांनाही भेटलो. वेबसाईट हँग होत असल्याने काल अखेरच्या दिवशी असंख्य युवांना तलाठी भरतीचे फॉर्म भरता आले नाहीत. अनेकांना नोंदणी करता आली नाही. त्यासाठी फॉर्म भरण्यास १५ दिवस मुदतवाढ द्यावी. लाखो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल.

तलाठी भरती : ‘डबल’ फायद्यासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज भरताना गैरमार्गाचा वापर

रोहित पवारांच्या या मागणीवर बोलताना फडणवीस म्हणाले, ‘अर्ज भरण्यासाठी यापूर्वी मुदतवाढ दिली होती. आता पुन्हा मुदतवाढ देण्याबाबत महसूलमंत्र्यांना विनंती केली आहे.’ फडणवीस यांनी दिलेल्या माहितीमुळे आता तलाठी भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्यांना पुन्हा दिलासा मिळू शकतो. तांत्रिक कारणांमुळे अर्ज न भरता आलेल्या उमेदवारांसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ऑनलाईन अर्ज (Online Application) भरण्याच्या प्रक्रियेत अर्ज व शुल्क भरून अर्ज सादर केल्यानंतर अर्जात कोणतीही दुरुस्ती करता येत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती. त्यामुळे दुरुस्तीची संधी देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. मात्र महसूल विभागाकडून अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यावरूनही विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD