कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रान्स  टेस्टनंतर आता कॉमन काउंसलिंगची तयारी 

NTA ने पुढील शैक्षणिक वर्षांपासून विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी सामायिक समुपदेशन म्हणजेच कॉमन काउंसलिंगची  तयारी सुरु केली आहे.

कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रान्स  टेस्टनंतर आता कॉमन काउंसलिंगची तयारी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

देशभरातील विद्यापीठे आणि पदवी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी  या वर्षी म्हणजेच २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) ने कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रान्स  टेस्ट (CUET) UG घेण्याचे ठरवले आहे. आता पुढचे पाऊल म्हणून NTA ने पुढील शैक्षणिक वर्षांपासून विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी सामायिक समुपदेशन म्हणजेच कॉमन काउंसलिंगची  तयारी सुरु केली आहे. सामायिक समुपदेशनाच्या अंमलबजावणीमुळे, विद्यार्थ्यांना विविध विद्यापीठे किंवा महाविद्यालयांसाठी स्वतंत्रपणे नोंदणी करावी लागणार नाही. सामायिक समुपदेशन पुढील वर्षापासून म्हणजेच शैक्षणिक सत्र 2024-25 पासून लागू केले जाऊ शकते, अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ट्विटरवरून प्रसिध्द केली आहे. 
   विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष, प्रा.  एम. जगदीश कुमार यांचे  या ट्विटमध्ये एक वक्तव्य शेअर करण्यात आले आहे. ज्यामध्ये जगदीश कुमार यांनी म्हटले आहे की,  “केंद्रीय विद्यापीठांमध्ये समुपदेशन प्रक्रिया आता एका नवीन स्तरावर नेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या केंद्रीय विद्यापीठांमध्ये नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही. सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये पुढील वर्षीपासून ऑनलाइन पद्धतीने कॉमन कौन्सलिंगच्या माध्यमातून  प्रवेश दिला  जाईल."